भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शाळा सुरु होऊन एक महिना उलटला असलातरी भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळालेले नाहीत. दि. १५ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गणवेश मिळावे यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार भंडारा चे जिल्हा महासचिव विनोद वट्टी यांनी शिक्षणाधिकारी भंडारा यांच्याशी निवेदन देऊन मागणी केली. विद्यार्थ्यांना जुनेच गणवेश परिधान करून शाळेत यावे लागत असल्याने पालकांनी शासनाच्या धोरणाबद्दल संताप व्यक्त केला आहे. यंदाचे गणवेशाचे कापड राज्य पातळीवरून पुरविण्यात येणार असल्याने शाळा व्यवस्थापन समितीला बचत गटाच्या मार्फत कपडे शिवून देणे असल्याने यात बराच कालावधी जाणार आहे. स्वातंत्र्यदिना पूर्वीही गणवेश मिळतील याविषयी संभ्रम आहे. जिल्ह्यातील सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांतील पहिली ते आठवीत् ाील लाखो मुले शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेशाविनाच शाळेत पोहोचले. त्यामुळे शालेय शिक्षण आणि समग्र शिक्षा अभियानाच्या धोरणात्मक दिरंगाईचा मोठा फटका जिल्ह्यातील लाखो विद्यार्थ्यांना बसल्या असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
यंदा सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून गणवेशाचा कापड पुरविले जाणार आहेत. महिना उलटला तरी तो कापड पंचायत समिती स्तरावर पडून असून महागाई च्या काळात ११० रुपयात कपडे शिवण्याचे आव्हान मुख्याध्यापकांना आहे. शासनाने यात एक गणवेश हा स्काऊट गाईडप्रमाणे आणि एक नियमित गणवेश ठरविण्यात आला आहे. यातील स्काऊट आणि गाईडचा गणवेश तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समित्यांवर आहे. ही प्रकिया किचकट असून कापड पूरविण्याऐवजी पूर्ण गणवेश पुरवावे. किंवा जुनीच प्रकिया करावी व सर्व विद्यार्थांना स्वातंत्र्यदिनी गणवेश द्यावे. शिक्षणाधिकारी यांना निवेदन देतांनी राष्ट्रवादि काँग्रेस युवक काँग्रेस जिल्हा महासचिव विनोद वट्टी, उपाध्यक्ष यशवंत भोयर, प्रमोद वरठे, जयंत वरठे, संदीप ठवरे व समस्त जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.