भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्हा सामान्य रूग्णालयातील रूग्णांना निकृष्ट दर्जाचा आहार देण्यात येत असल्याचा आरोप येथील रूग्ण व त्यांचे नातेवाईकांकडुन होत आहे. जिल्हा रूग्णालयात रूग्णांना वेळापत्रकानुसार ठराविक दिवशी ठराविक आहार देण्याचा नियम आहे मात्र त्याचे कुठेही पालन होतांना दिसुन येत नाही. त्यामुळे येथील रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडुन रोष व्यक्त केला जात असुन जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालय हे जिल्ह्यातील महत्वाचे रूग्णालय असुन येथे संपुर्ण जिल्ह्यासह मध्य प्रदेश व छत्तीसगड येथील नागरीक सुध्दा उपचाराकरीता येत असतात. रूग्णाला योग्य औषधोपचारासोबतच योग्य आहार दिला गेला तर तो लवकर बरा होतो. हे सत्य आहे.आणि याच भावनेतुन जिल्हा रूग्णालयात उपचाराकरीता आंतररूग्ण विभागात भरती होणाºया रूग्णांना शासन सकस आहार देत असतो.येथे उपचार घेणाºया रूग्णांना सकाळी चहा,दुध, नाश्ता व दुपारी तसेच रात्री जेवणाची व्यवस्था जिल्हा रूग्णालय प्रशासनातर्फे करण्यात येते.
मात्र जिल्हा सामान्य रूग्णालयातील रूग्णांना सकस आहाराच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचे जेवण व नाश्ता दिला जात असल्याचा आरोप रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडुन होत आहे. रूग्णांना नाश्ता व जेवण देण्याचे शासन नियम आहे. त्यानुसार रुग्णालयातील रुग्णांना जेवण, नाश्ता, फळे व दूध आदि देण्याचे व तेसुध्दा उत्कृष्ट दर्जाचे असावे असा नियम आहे. मात्र त्या नियमांना डावलुन मनाला वाटेल त्या दिवशी आपल्या मनमर्जीने कोणतेही पदार्थ रूग्णांना जेवणामध्ये दिले जात आहे. भंडारा जिल्हा रूग्णालयातील रूग्णांना आहार पुरविण्याचे कंत्राट मुंबईच्या एका कंपनीला देण्यात आले आहे. नियमानुसार कोणत्या रूग्णाला कुठला आहार द्यायचा याचे काही नियम आहेत. मग तो पुरुष असो वा स्त्री किंवा गर्भवती महिला किंवा लहान मूल, या सर्वांना कोणत्या वेळी कोणता आहार व किती प्रमाणात द्यावा याचे शासकीय नियम आहेत. मात्र त्याचे पालन होतांना दिसत नाही. या सगळ्या प्रकाराकडे जिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासनाचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप रूग्ण व नातेवाईक करीत आहेत.