भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : गेल्या १२ तासापासून साकोली तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे साकोली तुमसर मार्गावरील मक्कीटोला पुलाचे बांधकाम सुरू असल्याने तयार करण्यात आलेला पर्यायी रस्ता पुन्हा गुरुवारी १ आॅगष्टला वाहून गेला. त्यामुळे साकोली तुमसर मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे ठप्प झाली आहे. गेल्या सहा महिन्यापासून मक्कीटोला येथे पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे प्रवाशी नागरीकांसाठी पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. मुसळधार पावसाने हा रस्ता २६ जुलैला वाहून गेला होता. परंतु वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून पुन्हा या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते.
मात्र गुरुवार पहाटे झालेल्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा हा पर्यायी रस्ता वाहून गेल्यामुळे साकोली तुमसर वाहतूक ठप्प झाल्याने नागरीकां ची मोठी गैरसोय झाली . अति पावसामुळे रस्त्यावरून पाणीही दोन फुटापर्यंत वाहत असल्याने या पाण्यातून कोणीही नागरिकांनी रस्ता ओलांडू नये असे आवाहन साकोली पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांनी केले आहे. मक्किटोला येथील पुल वाहून गेल्यामुळे नागरिकांना कामानिमित्त साकोलीला येता आले नाही. मक्कीटोला येथील अनेक विद्यार्थी चांदोरी, एकोडी, साकोली येथे शालये शिक्षण घेण्याकरीता बसने प्रवास करतात परंतु पूल वाहून गेल्याने व रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने विद्यार्थ्यांना वाहतूक सुरू झाल्याशिवाय या मार्गाने प्रवास करता येणार नाही. साकोली तालुक्यात पावसाचा हाहाकार माजला असून सुरक्षेसाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत.