भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : बांधकाम कामगार नोंदणी मध्ये येत असलेल्या अडचणींना लक्षात घेत आम. नरेंद्र भोंडेकर यांनी राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांची भेट घेतली व कामगारांची नोंदणी ही नगर पंचायत व पंचायत समिती स्तरावर गट विकास अधिकारी मार्फत करण्यात यावी अशी मागणी केली. भेटी दरम्यान आम. भोंडेकर यांनी या मागणीचे एक निवेदन सुद्धा मंत्री महोदयांना दिले. ज्यावर सकारात्मक विचार करून तत्काळ निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मुंबई येथे आम. नरेंद्र भोंडेकर यांनी राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्याशी भेटी दरम्यान कामगारांच्या समस्या त्यांच्या समोर मांडल्या. आम. भोंडेकर यांनी त्यांना सांगितले की शासन तर्फे चालविण्यात येत असलेली योजना ही कामगारांकरीता अत्यंत उपयोगी ठरत आहे आणि या योजनेच्या लाभाकरीता अनेक कामगारांनी कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालया मार्फत नोंदणी केली परंतु जिल्ह्यात कामगारांची संख्या अधिक असल्याने या योजनेत नोंदणी करतांना कामगारांना अनेक अडचणींना सामोर जावे लागत आहे.
संबंधित कार्यालयात मानुष्यबळ कमी असल्याने अनेक कामगारांची नोंदणी होऊ शकली नाही आणि ते योजने पासून वंचित झाले आहे. इतकेच नाही तर ग्रामीण क्षेत्रातील कामगारांना नोंदणी करिता जिल्हा मुख्यालयात यावे लागत आहे. ज्यामुळे गरीब कामगारांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. करिता या योजनेचा लाभ अधिक कामगारांना व्हावा या दृष्टीने योजनेची नोंदणी प्रक्रिया नगर पंचायत व पंचायत समिति स्तरावर गट विकास अधिकारी मार्फत राबविण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन आम. नरेंद्र भोंडेकर यांनी कामगार मंत्र्यांना दिले. सोबतच ज्या कामगारांची नोंदणी झाली असून त्यांचे अर्ज प्रलंबित असतील असे अर्ज लवकरात लवकर निकाली लावण्यात यावे अशी मागणी आम. भोंडेकर यांनी आपल्या निवेदनात केली आहे.