भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : कृषी आणि विज्ञान क्षेत्रात संपूर्ण जगात भारताचे नावलौकीक करणारे, वंचित, शेतकरी, कष्टकरी, गरीब यांच्या कल्याणासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे देशाचे माजी कृषीमंत्री भाऊसाहेब डॉ.पंजाबराव देशमुख यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान ‘‘भारतरत्न’’ ने सन्मानित करण्यात यावे, अशी विनंती माजी मंत्री, आ. डॉ. परिणय फुके यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राच्या माध्यमातून केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात, आमदार डॉ. फुके यांनी म्हटले आहे की, डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या कार्याची महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला माहिती आहे. ते विद्वान व्यक्तिमत्व होते. भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांनी आपले संपूर्ण आयुष्य वंचितांच्या उन्नतीसाठी समर्पित केले.
शेतकरी, मजूर आणि गरिबांच्या कल्याणासाठी त्यांनी सतत काम केले. डॉ. फुके यांनी पुढे म्हटले आहे की, भाऊसाहेब डॉ.पंजाबराव देशमुख हे संस्कृती आणि विज्ञानाच्या संगमाचे प्रतीक होते. ऋषीमुनींच्या परंपरा आणि शेती यांच्यात त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सुसंवाद होता. ते संस्कृतचे पंडित तर होतेच, ते देशाचे कृषिमंत्रीही होते. भारतीय संविधान सभेचे सदस्य म्हणून त्यांचे योगदान महत्त्वाचे होते. विदभार्तील प्रतिष्ठित शिवाजी एज्युकेशन सोसायटी आणि सेंट्रल प्रोव्हिन्सेस फार्मर्स युनियनचे संस्थापक म्हणून त्यांचे कार्य मोठे आहे. भारत कृषक समाजाची त्यांनी स्थापना केली. देशातील शेतकºयांसाठी आयुष्य वेचणाºया डॉ.पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करून देशातील कृषी आणि भूमिपुत्रांचा सन्मान करावा, अशी विनंती डॉ. फुके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या पत्रातून केली आहे.