रक्षाबंधनापूर्वीच मिळणार बहिणींना ओवाळणी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ आॅगस्टला मिळणार आहे. त्यामुळें रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळणार आहे. आतापर्यंत १ कोटी ४० लाख अर्ज दाखल झाले असून त्यापैकी १ कोटी अर्जांची छानणी सुद्धा पूर्ण झालेली आहे. या योजनेसाठी ३१ आॅगस्टपर्यंत महिलांना अर्ज करण्यासाठी मुभा दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ आॅगस्टलाच मिळणार असून याबाबत शासन दरबारी निर्णय झाला आहे. विशेष म्हणजे १७ आॅगस्ट रोजी राज्य सरकारकडून भव्य दिव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पैसे थेट महिलांच्या बँक खात्यात वितरीत केले जाणार आहेत. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाला एकाच मंचावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत. तर, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री या कार्यक्रमातून उपस्थित राहतील.

दरम्यान, १७ जुलै आणि आॅगस्ट महिन्यांचा एकत्रित हप्ता म्हणजेच ३ हजार रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट जमा होणार असल्याचीही माहिती समोर येत आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयामुळे योजनेसाठी पात्र झालेल्या महिलांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली असून आता त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १ कोटी ४० लाख १० हजार २१५ अर्ज आॅनलाईन भरण्यात आले आहेत. त्यापैकी १ कोटी अर्जांची छाननी करण्यात आलेली आहे. त्यात ८३ टक्केहून अधिक अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. तर जवळपास १२ हजार अर्ज अवैध ठरवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *