भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : महिनाभरापूर्वी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर माजी खासदार शिशुपाल पटले हे मुंबईमध्ये स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ किंवा १६ आॅगस्टला काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तुमसर विधानसभा मतदार संघातील, शेतकरी, बेरोजगार, बावनथडी प्रकल्पाअंतर्गत येणाºया १२ गावांना सिंचन व्यवस्था आदीच्या प्रश्ना कडे राज्य व केंद्र सरकार लक्ष देत नसल्याच्या कारणावरून शिशुपाल पटले यांनी २५ जुलै रोजी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वचा राजीनामा दिला होता मात्र राज्यातील पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाºयाने त्यांची भेट घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला नाही अथवा त्यांच्या प्रश्नावर चर्चा सुध्दा केली नाही, त्यामुळेच पटले यांनी हा निर्णय घेतला असल्याचे समजते.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पटले यांचा हा निर्णय भाजपसाठी फार मोठा झटका मानला जात आहे. भंडारा गोंदिया जिल्ह्यात पोवार समाज मोठ्या प्रमाणात असून समाजाची ताकद भाजपकडे अधिक आहे. माजी खासदार शिशुपाल पटले यांच्यावर पक्ष सोडण्याची वेळ येत असेल तर या समाजाची भाजपची वोटबँक सुध्दा आपली राजकीय दिशा बदलू शकते. राजकारणात इमानदार नेता मिळणे कठीण आहे. शिशुपाल पटलेंच्या रूपाने एक चांगला नेता भाजपने गमावला आहे. भाजपाला झालेली क्षती भरून निघणे कठीण आहे.