भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा व सर्व आदिवासी सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ११ आॅगस्ट २०२४ रोजी मंगलम सभागृह, नागपूर रोड, भंडारा येथे जागतिक आदिवासी दिनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रथमत: सकाळी दसरा मैदान येथून आदिवासी संस्कृती दर्शन व महा रॅलीचे सुरुवात झाली. सदर रॅली दसरा मैदान येथून सुरू होऊन गांधी चौक, पोस्ट आॅफिस चौक, मुस्लिम लायब्ररी चौक, राणी दुर्गावती चौक, राजीव गांधी चौक येथून मार्गस्थ होत बिरसा मुंडा चौक नागपूर नाका येथे संपन्न झाली. रॅलीमध्ये आदिवासी संस्कृती दर्शन दर्शविणाºया तसेच आदिवासी थोर क्रांतिकारक महापुरुष यांचे जीवनपट दर्शविणाºया झाकी प्रस्तुत करण्यात आल्या. मंगलम सभागृह येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर उपस्थित होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सोयाम, जिल्हा शल्य चिकित्सक भंडारा, रवींद्र सलामे, शिक्षण अधिकारी चेतन मसराम, प्राचार्य एस. एन. मोर कॉलेज, तुमसर व सर्व आदिवासी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी समाजाच्या क्रांतिकारक तसेच थोर पुरुष यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी नीरज मोरे यांनी केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी प्रकल्प कार्यालयाच्या विविध योजना तसेच आश्रम शाळा वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीकरिता राबविण्यात येणाºया विशेष प्रकल्पांवर प्रकाश टाकला. त्यानंतर सन २०२३-२४ च्या १० वी व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. त्यानंतर आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीकरिता राबविण्यात येणाºया ब्राईटरमाईंड व मेमोरी इनहान्समेंट या विशेष कार्यक्रमाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
ब्राईटर माईंड चे प्रशिक्षणार्थी प्रेरणा विजय सलामे, वर्ग ८ वी व रवीना रमेश मरकाम वर्ग ५ वी यांनी डोळ्यावर पट्टी बांधून त्यांच्या हातात दिलेल्या बॉलचे रंग ओळखले मा. जिल्हाधिकारी यांनी सुद्धा कु. प्रेरणा सलामे हिच्या हातात बॉल दिला असता त्याचा रंग तिने बरोबर ओळखला. तसेच कु. तारिका युवराज पंधरे वर्ग १० वी हिने शाळेवर राबविण्यात येणाºया मेमोरी इनहान्समेंट या उपक्रमाची माहिती दिली व त्याचा उपयोग अभ्यासात एकाग्रता वाढीसाठी कशा प्रमाणात होतो याबद्दल मनोगत व्यक्त केले. जिल्हाधिकारी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले तसेच सर्व आदिवासी सामाजिक संघटना व प्रकल्प कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाचे सुद्धा कौतुक केले.
विविध सामाजिक संघटना व प्रकल्प कार्यालय यांच्या संयुक्त प्रयत्नाने आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्यास व त्यांच्याकरिता नवनवीन उपक्रम राबविण्यास नक्कीच मदत मिळेल असाविश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच कार्यक्रमाच्या उपस्थितीमुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याचे त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात नमूद केले. या प्रसंगी सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा व वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृतीक नृत्य प्रदर्शित केले. तसेच आदिवासी समाजातून संघर्षपूर्ण जीवन जगत उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत डॉक्टर सोयाम, जिल्हा शल्य चिकित्सक भंडारा, रवींद्र सलामे, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद भंडारा, चेतन मसराम प्राचार्य एस. एन. मोरे कॉलेज तुमसर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. व आजच्या स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्याकरिता शिक्षणाची आवश्यकता, स्वत:वरचा विश्वास, दृढ संकल्प, सततचे प्रयत्न व चिकाटी यांची गरज असल्याचे नमूद केले.