भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा :- आज ऋतू चक्रात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. पुर्वी उन्हाळा, पावसाळा व हिवाळा असे तीन ऋतू विशिष्ट महिन्यात पहावयास मिळत होते. मात्र आज एकाच दिवशी तिन्ही ऋतूंचा अनुभव घेता येतो. कारण मानवाने स्वत: च्या स्वाथार्साठी अमानुष वृक्ष तोड केली आहे. त्यामुळे ग्लोबल वार्मिंग सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हे केवळ मानवाच्या चुकीने झाले आहे. त्याचाच परिणाम आज पहात आहोत. पाण्याची पातळी खोल गेली आहे. तसेच कोरोना सारख्या महामारीने निसर्ग व मानवाचा किती अतुट संबंध आहे हे दाखवून दिले आहे. त्यावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी लग्न, वाढदिवस, आनंद व दु:खाच्या क्षण असो अशाप्रकारे विविध कार्यक्रमात वृक्षारोपण करावे असे प्रतिपादन जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा बेलाचे शालेय व्यवस्थापन समितीअध्यक्ष संजय गाढवे यांनी केले.
ते जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बेला येथील ग्रीन युको क्लबच्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त केंद्र प्रमुख प्रदीप काटेखाये होते. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय गाढवे यांच्या हस्ते वृक्षारोपणकरण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून पतंजलि योग समिती खोकरलाचे अध्यक्ष यशवंत बिरे, इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मिरा शेबे, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या आरती इलुरकर, भाग्यश्री केवट इत्यादी मान्यवर उपस्थित होते.