भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : महाराष्ट्रात महायुती सरकारने प्रगती आणि विकासाच्या नव्या आशा व आकांक्षाची पायाभरणी केली आहे. लोकहिताचे निर्णय घेऊन सर्वसामान्य जनता, शेतकरी व समाजाच्या सर्व घटकांच्या विकासासाठी राज्य शासन कार्य करीत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, युवा कार्य प्रशिक्षण योजना, तीर्थ दर्शन योजना, वयोश्री योजना, बळीराजा मोफत वीज योजना, अन्नपुर्णा योजना, मुलींना मोफत शिक्षण, नुकसानग्रस्तांना मदत वाटप, आनंदाचा शिधा वाटप, ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याण मंडळ आदी योजना कार्यान्वित करुन महायुती सरकारने प्रगतीचा वेग वाढविण्यात यश संपादन करून सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाला गती प्राप्त करुन दिली, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले. पोलीस मुख्यालय येथे आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य ध्वजारोहण समारोह कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी प्रजित नायर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रारंभी पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर मैदानावरील परेडचे निरीक्षण केले. पोलीस बँड पथकाने महाराष्ट्र गीत सादर केले. भारत राखीव बटालीयन पथक, पुरुष पोलीस दल, महिला पोलीस दल, होमगार्ड पुरुष पथक, होमगार्ड महिला पथक, माजी सैनिक दल, फुलचूर हायस्कुल भारत स्काऊट पथक, पोलीस बँड पथक व श्वान पथक यांनी परेडचे संचलन केले. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ ही राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना असून गोंदिया जिल्ह्यात या योजनेला माता-भगीणींचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेत आतापर्यंत २ लाख ८४ हजार ८५६ लाडक्या बहिणी पात्र झाल्या आहेत. योजनेच्या लाभाचे दोन हप्ते रक्षाबंधनपूर्वी खात्यात जमा होणार आहेत. या योजनेतून कुठलीही बहीण वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे. या योजनेत २१ ते ६५ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ सुरु करण्यात आली आहे. या योजनेत युवकांना शासकीय व खाजगी आस्थापनामध्ये प्रशिक्षणासह ६ ते १० हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. या योजनेतून प्रशिक्षीत युवा वर्ग निर्माण होणार आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यामध्ये महास्वयंम पोर्टलवर ३५६१ उमेदवारांनी आॅनलाईन नोंदणी केलेली आहे. तसेच या योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील शासकीय उद्योजक आस्थापना यांनी १८९७ पदे व खाजगी उद्योजक आस्थापना यांनी २२० पदे असे एकुण २११७ पदे अधिसूचित केलेली आहेत असे पालकमंत्री म्हणाले. महाराष्ट्रातील मुलींना आता शिक्षणाची संधी मोफत मिळणार आहे. वकील, डॉक्टर, इंजिनियर यासारख्या उच्च पदव्यांसाठी आर्थिक अडचणीआता अडथळा ठरणार नाही. आपल्या मुलींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महायुती सरकर कटिबध्द आहे. गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे अडचणीत आलेल्या साडेसात एचपी पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांसाठी बळीराजा मोफत वीज योजना सुरु करण्यात आली असून याचा लाभ जिल्ह्यातील शेतकºयांना मिळणार आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटूंबाला अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. गौरी-गणपतीच्या सणानिमीत्त शंभर रुपयात जिल्ह्यातील पात्र कुटूंबांना ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात येणार आहे. हे प्रगतीचे आणखी एक पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपजिल्हाधिकारी मानसी पाटील, किरण अंबेकर, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, पोलीस उपअधीक्षक नंदिनी चानपूरकर यांचेसह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंजुश्री देशपांडे व राजन चौबे यांनी केले.