भंडारा : १ आॅगस्ट पासून सुरू झालेल्या महसूल पंधरवड्याची सांगता पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाली. नियोजन भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक लोहित मतानी प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्ह्यातील अतिवृष्टी दरम्यान प्रशासनाने केलेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाचे श्री.गावित यांनी कौतुक केले. दिव्यांग पुनर्वसन केंद्र स्थापन केल्याबद्दल व दिव्यांग सेवे बद्दल मार्गदर्शन केले. लाडकी बहीण् योजना ही महत्वाची योजना आहे, या योजनेच्या अंमलबजावणीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच दिव्यांगाप्रती संवेदनशीलतेने काम करण्याची गरज असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात शासकीय लाभ व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. समाज कल्याण विभागामार्फत यशवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी लीना फलके, उत्कृष्ट तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर लाखनी, उत्कृष्ट कर्मचारी निमिश गेडाम यांनी पालकमंत्री यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी महसुल व पोलीस यांच्यात समन्वय असुन योग्य समन्वयाने जिल्हयात उत्तम काम होत असल्याची ग्वाही दिली व जिल्हाधिकारी श्री.कुंभेजकर यांनी यावेळी लोकसभा २०२४ तसेच आपत्ती व पुरपरिस्थीती दरम्यान महसूल व अन्य विभागांनी केलेल्या समन्वयाने जिल्हयात नुकसान टाळता आल्याचे सांगितले. भविष्यातही महसूल प्रशासन उत्तम काम करेल असे आश्वासीत केले.