भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरावर झालेल्या घृणास्पद कृत्याची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी तसेच संपुर्ण भारत देशातील डॉक्टर व नर्सिंग कर्मचाºयांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या नेतृत्वात भंडारा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देशाचे राष्टÑपती यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील रुग्णालयात ९ आॅगस्ट रोजी प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा मृतदेह सापडला होता. शवविच्छेदन अहवालात पिडीत डॉक्टरर बलात्कार करून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. सुरुवातीला हे घृणास्पद कृत्य दडपण्याचा लज्जास्पद प्रयत्न झाला, मात्र जनआंदोलनाच्या दबावापुढे राज्य सरकारला नमते घ्यावे लागले. तरीही राज्य सरकारच्या संदिग्ध भूमिकेमुळे या प्रकरणाचे सत्य समोर आलेले नाही. शवविछेदन अहवालात नोंदवलेल्या निरीक्षणानुसार, या घटनेत एकापेक्षा जास्त गुन्हेगार सहभागी होते. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन भंडारा या लाजिरवाण्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत असून या प्रकरणाची चौकशी करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफ हे चोवीस तास आपल्या सेवेत गुंतलेले असून विशेषत: महिला कर्मचाºयांसाठी रात्री कामावर जाणे किंवा परतणे हे आव्हानात्मक काम झाले आहे. यामुळे त्यांना न घाबरता काम करणे अशक्य झाले आहे. करीता कोलकाता निवासी डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणाची केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, याप्रकरणी तज्ञ समिती गठीत करून केंद्रीय आरोग्य सेवा संरक्षण कायद्याचे काटेकोर पालन करण्यात यावे, कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांसाठी वसतिगृहांची व्यवस्था करण्यात यावी आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज खोल्या उपलब्ध करून देण्यात याव्या, रुग्णालयाच्या आवारात अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत आणि पुरेसे सुरक्षा रक्षक नेमण्यात यावे आदि मागण्यांचा निवेदनात समावेश करण्यात आला आहे. निवेदन देताना भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे, मनोज बागडे, प्यारेलाल वाघमारे, पवन वंजारी, धनंजय तिरपुडे, अनिता भुरे, मुकुंद साखरकर, नितेश मारवाडे, सुगाता शेंडे, भंडारा जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.