भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : शेतातील हंगामनिहाय घेतलेल्या उभ्या पिकांची आपल्या ‘सातबारा’ वर वस्तुनिष्ठ, अचूक व पारदर्शक नोंद व्हावी याकरिता राज्यात ‘ई-पीक’ पाहणी उपक्रम राबवण्यात येत आहे. यंदाच्या खरीप हंगामाचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर झाला असून, येणाºया १ आॅगस्टपासून १५ सप्टेंबरपर्यंत शेतकºयांनी स्वत:हून आपल्या पिकांची अद्ययावत ई पिक पाहणी मोबाईल अॅप द्वारे करून ई पिक नोंदणी करावी असे आवाहन तहसीलदार निलेश कदम यांनी केले आहे. तहसीलदार कदम यांनी तालुक्यातील वलमाझरी येथील शेतशिवारात शेतकºयांशी संवाद साधून प्रात्यक्षिक रित्या बांधावर शेतकºयांची ई पिक पाहणी व नोंदणी संबंधी सविस्तर माहिती दिली. यावेळी तलाठी, पोलीस पाटील व शेतकरी बांधव उपस्थित होते. साकोली तालुक्यातील प्रत्येक शेतकºयाने आपल्या वाहीत क्षेत्रावर खरीप हंगामात घेतलेल्या पिकांची ‘सातबारा’वर नोंद होत असते.
यापूर्वी अशा नोंदी तलाठी करत होते. मात्र, महाराष्ट्र शासनाने याला ‘हायटेक’ स्वरूप देत यात अधिक अद्ययावतपणा आणला. यासाठी प्ले स्टोअरवर ई-पीक पाहणी हे अॅप उपलब्ध करून दिले. युजर फ्रेंडली असलेल्या या अॅपला आपल्या मोबाईलवर डाऊनलोड केल्यानंतर शेतकरी स्वत:च्या शेतातील उभ्या पिकांची अक्षांश-रेखांश आधारित सचित्र नोंद करू लागले आहेत. या नोंदीनुसार तलाठी याची सत्यता पडताळणी करून पीक नोंदी सातबारावर प्रतिबंधित करत आहेत. गतवर्षी यात काही त्रुटी होत्या. यामध्ये तलाठी, कृषी सहाय्यक व शेतकºयांनी केलेल्या सूचनेनुसार सुधारणा करत नवीन ई-पीक पाहणी वर्जन अॅप उपलब्ध करून दिले आहे. यामुळे यात अधिक सुविधा आॅप्शन्स प्राप्त झाले आहेत. यंदाच्या हंगामात शेतकºयांनी अधिकाधिक नोंदणी करून ध्यावी, असे आवाहन तहसीलदार निलेश कदम यांनी केले आहे. तालुक्यातील ९४ गावात शेतकºयांच्या सोयीसाठी ई पीकनोंदणी करिता सहाय्यकाची नेमणूक करण्यात आलेली आहे.