भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : उन्हाळी धान पिकांचे अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या धान पिकांचे सर्वेक्षणही झाले; परंतु नुकसान झाल्याचे जाहीर करण्यात आले नाही. खरीप २०२३ चे अद्यापही तुणतुणे हलविण्यात येत आहे. उन्हाळी धान पिकांचे नुकसान झाले असताना महसूल विभागाने बांधावर जाऊन सर्वेक्षण केले आहे. आता आर्थिक मदतीची शेतकºयांना प्रतीक्षा आहे. उन्हाळी २०२४ च्या धान पिकांना अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले होते. जमिनीवर धानाचे पीक लोळले होते. अनेक धान पिकांच्या कडप्यांना कोंब फुटले होते. उन्हाळी धान पिकांचे अवकाळी पावसाने नुकसान झाल्यानंतर महसूल विभागाने सर्वेक्षणाचे निर्देश दिले होते. तलाठी आणि कृषी विभागाच्या कर्मचाºयांनी बांधावर जाऊन सर्वेक्षण केले आहे. प्रथम आणि द्वितीय याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत.
प्रथम आणि पुरवणी याद्या तयार करण्यात आल्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्धीसाठी लावण्यात आलेल्या होत्या. तलाठ्यांच्या स्वाक्षरींनी या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या; परंतु अद्यापही उन्हाळी धान पिकांच्या नुकसानी संदर्भात प्रति हेक्टरी आर्थिक मदत घोषित करण्यात आली नाही. दरम्यान, खरीप हंगाम २०२३ वर्षात नुकसान झालेल्या शेतकºयांना केवायसी करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. यासंदर्भात ग्रामपंचायतीमध्ये सूचना दिलेल्या होत्या; परंतु उन्हाळी २०२४ च्या धान पिकांच्या संदर्भात काहीच बोलले जात नाही. यामुळे उन्हाळी धान पिकांच्या नुकसानी संदर्भात शेतकºयांना आर्थिक मदत मिळणार किंवा नाही, अशी शंका शेतकºयांना झाली आहे. दरवर्षी एकतरी पुराचे पाणी शिरत आहे. कधी तीन पूर शेतकºयांनी अनुभवले आहेत. उन्हाळ्यात शेतकरी धानाचे जोरदार पीक घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. उन्हाळी २०२४ पिकांना मात्र अवकाळी पावसाने नुकसान केले आहे. सर्वेक्षण झालेल्या शेतकºयांना तातडीची आर्थिक मदत देण्याची मागणी पंचायत समिती सदस्य सुभाष बोरकर व सिहोरा परिसरातील शेतकरी वर्ग करु लागला आहे.