भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : बेनाम संपत्ती तसेच करोडपती असलेल्या भंडारा जिल्हा मजूर संघाच्या अध्यक्षाला तात्काळ पदमुक्त करावे व त्यांच्या सर्व संपत्तीची चौकशी करुन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी एका तक्रारकर्त्यांने व भंडारा जिल्हा नवीन मजूर संघटनेच्या वतीने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था भंडारा व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था लाखनी यांना केली असून सदर तक्रारीची प्रतिलिपी सहकार आयुक्त पुणे, विभागीय सहनिबंधक नागपूर, आयकर अधिकारी भंडारा, प्र. आयकर आयुक्त नागपूर यांना दिली आहे. सहकार कायद्यान्वये नोंदणी केलेल्या मजूर सहकारी संस्थांना नियमाप्रमाणे मजुरांचा अर्थिक आणि सामाजिक स्तर उंचवावा त्यांना रोजगार संधी उपलब्ध व्हावी या दृष्टीकोनातून मजूर संस्थांची स्थापना करत त्यांच्यामार्फत विकास कामे करून घेण्याचे धोरण शासनाद्वारे स्विकारण्यात आले होते. मात्र या संस्थांमध्ये गरीब मजुरांऐवजी धनदांडगेच शिरले आहे. यामुळे मजुरांचा जीवनस्तर उंचावण्याचा शासनाचा उद्देश विफल होत असल्याचे दिसून येत आहे. असाच एक प्रकार समोर आला आहे. गणराजबाबा मजूर सहकारी संस्था मेंगापूर या संस्थेचा हा मजूर साधासुधा नाही तर करोडपती असलेला आहे, असा आरोप करण्यात येतोय.
भरत सुदाम खंडाईत असं या मजूर व्यक्तीचं नाव आहे. तर हे सद्या भंडारा जिल्ह्या मजूर संघांचे अध्यक्ष सुद्धा आहेत. गाव नमूना सात अधिकार अभिलेख पत्रक गाव कवलेवाडा, तालूका लाखनी भुमापन क्रमांक १२१,५३५/२,६०५/३ या अभिलेखानुसार करोडो रुपयाची संपत्ती आहे. तर त्यावर ३ करोड २५ लक्ष रुपये राष्ट्रीयकृत बँकेत कर्ज घेऊन सातबारा वर बोझा चढवलेला आहे. खंडाईत हे गणराजबाबा मजूर सहकारी संस्था मर्यादित मेंगापुर तालुका लाखनी या संस्थेत मजूर आहेत. सातबारावरील पुराव्याच्या आधारे असे दिसून येते की संबधित अध्यक्ष यांच्या नावावर कोट्यावधी रुपयांची नियमबाह्य रित्या कमावलेली मालमत्ता आहे. तसेच हे जिल्ह्यातील गब्बर असलेल्या कंत्राटदाराच्या नावावर काम करतात याची सुधा चर्चा आहे. या अभिलेखानुसार कोट्यावधी रुपयाची संपत्ति असलेला अध्यक्ष मजूर कसा? जर मजूर असेल तर करोडोची संपत्ती यांच्याकडे आली कशी? या निमित्ताने असा प्रश्न निर्माण होते. सहकार कायद्यानुसार एखादा मजूर अल्पभुधारक असेल त्यालाच मजूर संस्थेचा सदस्य होता येते.
सदर व्यती आर्थिक दृष्टया मजूर असल्याचे दिसत नाही. तसेच या धनदाडग्या मजुराकडे वेगवेगळ्या लोकांच्या नावावर बार, राईस मिल, १० ट्रक्टर, २ एसी असलेल्या फोर व्हीलर, पोक्लँंड, २ जेसीबी व भंडारा नागपुर अश्या मोठमोठ्या शहरामधे बेनामी संपत्ती असल्याची सुद्धा चर्चा आहे. असे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी या बेनामी संपत्तीची आयकर विभाग सहकार आयुक्त नियमानुसार चौकशी करुन सबंधितावर का-रवाई करावी. या अध्यक्षाला तात्काळ पदावरुन दूर करावे आणि गणराजबाबा मजूर सहकारी संस्था मर्यादित मेंगापुर तालुका लाखनी या संस्थेची नोंदणी रद्द करण्यात यावी. शासनाची दिशाभूल करुन बेनामी संपत्ती जमवली असल्याने संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी तक्रार एका तक्रारकर्त्याने व भंडारा जिल्हा नवीन मजूर संघटनेच्या वतीने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था भंडारा व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था लाखनी यांना केली असून सहकार आयुक्त पुणे, विभागीय सहनिबंधक नागपूर आयकर अधिकारी भंडारा, प्र. आयकर आयुक्त नागपूर यांना कार्यवाहिस्तव तक्रारीची प्रतिलिपी दिली आहे, असे तक्रारीत दिसते.