भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या प्रेरणेतून दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ एक दिवसीय कार्यशाळा राबविण्यात आली. दिव्यांगाप्रती संवदेनशीलतेने काम करावे असा सामायिक सूर या कार्यशाळेत उमटला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनिषा कुरसुंग, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प समन्वयक अभिजीत राऊत, जिल्हा नियोजन अधिकारी श्री.बोरकर, दिव्यांग कायदे तज्ञ डॉ. विनोद आसुदानी, आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेच्या सदस्य संगीता तुमाडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. जिल्हाधिकारी श्री.कुंभेजकर दिव्यांगाना मुलभुत सुविधा पुरवणे तसेच त्यांच्यासाठीचा निधीचा योग्य विनीयोग करण्याचे सांगितले तसेच ५ टक्के दिव्यांग कल्याण योजनेअंतर्गत व शासकीय योजनांचा लाभ देण्याबाबत मार्गदर्शन केले.
दिव्यांग कायदे तज्ञ श्री. आसुदानी यांनी दिव्यांगाना दया नको, अधिकार द्या. सामान्य जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले रोजगार, शिक्षण, प्रशिक्षण देण्याचे आवाहन केले. तर अधिका-यांनी दिव्यांगाशी संवेदनेने काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली. दिव्यांगाच्या जीवनावर आधारीत श्रीकांत चित्रपटातील अनेक प्रसंग व कविता तसेच कायद्यातील तरतुदींवर त्यांनी उत्तम पध्दतीने मार्गदर्शन केले. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प समन्वयक अभिजीत राऊत यांनी दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ मधील कायदे व अधिकार संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. त्यासोबतच शासनाच्या दिव्यांग व्यक्तींसाठी असलेले विविध कायदे व धोरणांसंदर्भात सविस्तर माहिती सांगितली. या कार्यशाळेला सर्व विभागप्रमुख कार्यशाळेचे प्रास्ताविक जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनिषा कुरसुंगे यांनी केले.