भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : येथील दुय्यम निबंधक कार्यालय सध्या दलालांच्या गराड्यात अडकले असून निबंधकांनी येथे पक्षकारांचे गळे कापण्यासाठी काही खास “डकेट” दलालांची नेमणूक केल्याची माहिती आहे. येथे नियमांवर बोट ठेवत आधी पक्षकारांची अडवणूक केली जाते व “लक्ष्मी” दर्शनानंतर तेच प्रकरण सोयीस्कर हाताळले जात असल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे या अनागोंदी व बोगस कारभाराची वरिष्ठांनी चौकशी करावी, अशी मागणी पक्षकारांकडून जोर धरत आहे. येथील जुन्या तहसील कार्यालयाच्या परिसरात असलेल्या शासकीय इमारतीतच दुय्यम निबंधक कार्यालय आहे. नियमित दुय्यम निबंधक अधिकारी पद स्थापना न झाल्याने सदर कार्यालयात प्रभारी दुय्यम निबंधक नियुक्त करण्यात आले आहे. येथे मालमत्ता खरेदी विक्रीच्या नोंदणीसाठी दुय्यम निबंधक दोन्ही पक्षकारांना नियम सांगून खरेदी विक्रीची रजिस्ट्रीच होत नसल्याचे सांगत पक्षकारांना आल्यापावली परतवून लावतात. कार्यालयातील दुय्यम निबंधक अधिकारी व शिपाई दस्तऐवजाची पडताळणी करतात व पक्षकारांना वेठीस धरून दस्तऐवज बरोबर नाही म्हणून लक्ष्मी दर्शन झाल्यानंतर त्याच दस्तऐवजावर नोंदणी देण्याचा प्रकार सुरू आहे.
नोंदणी व मुद्रांक विभागाच्या दुय्यक निबंधक कार्यालयामध्ये अंदाधुंदी मनमानी कारभार चालू असून तुकडा बंदी कायद्याचे उल्लंघन सर्रासपणे होत असल्याचे चित्र आहे. तसेच बेकायदेशीर नोंदवण्यात येणाºया कागदपत्रांची चौकशी होऊन त्यावर त्वरित कायदेशीर कारवाई व्हावीअशी मागणी अनेक तक्रारदारांनी केली आहे. साकोली येथील दुय्यम निबंधक कार्यालय हे नेहमीच चचेर्ला जात असून या कार्यालयात कायमच खरेदी विक्री व इतर कारणास्तव गर्दी असते त्याचाच फायदा येथील दलाल त्याचबरोबर कार्यालयातील कर्मचाºयासह अधिकारी उचलतात व सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांची पिळवणूक येथे होत असल्याची माहिती आहे.दुय्यक निबंधक कार्यालयामध्ये नियमांचा बागुलबुवा उभा करीत पक्षकारांचे गळे कापण्याचा एककलमी कार्यक्रम निबंधक तसेच अधिनस्त कर्मचाºयांकडून राबविण्यात येत आहे. येथे मोठ्या रक्कमेच्या मोबदल्यात अनेक खरेदी-विक्रीच्या नियमबाह्य बोगस नोंदण्या करण्यात येत असल्याची ओरड आहे. ओळखीच्या आधारावर येथे दलालांना अवैध वसुलीसाठी प्रोत्साहित केले जात असल्याने नेमके “ते” महाभाग कोण..? याविषयीची देखील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
या कार्यालयात आलेल्या पक्षकारांची मानसिक स्थिती खराब करून त्यांना आर्थिक देवानघेवाण करिता प्रवृत्त केले जात आहे. अशावेळी पक्षकार आपले काम लवकर व्हावे म्हणून अधिकाºयाने दलाला मार्फत मागितलेली मोठी रक्कम देतात. सदर कार्यालयात अतिरिक्त मागितलेली रक्कम दिली तर तात्काळ काम होते. आणि रक्कम दिली नाही तर अनेक कारणे सांगून त्याला हेलपाटे खावे लागतात. अनेक पक्षकारांनी आर्थिक बळी पडत असल्याची तक्रार वरिष्ठाकडे करून संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी अनेकदा केली मात्र दुय्यम निबंधक म्हणतात की वरिष्ठांनाही यातून हिस्सा पोहोचविला जातो म्हणून माझे काहीच होत नाही अशी चर्चा पक्षकारांमध्ये आहे. वरिष्ठांना वेळोवेळी अनेक तक्रारी या कार्यालयासंदर्भात केल्या गेल्या मात्र अद्याप कार्यालयात सुसूत्रता आलेली नाही. वरिष्ठ पातळीवरून यात दखल घेण्यात यावी व सर्वसामान्यांना न्याय मिळावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.