भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : कुटुंबियांसह गोरेगाव तालुक्यातील चुलबंद जलाशय येथे पर्यटनासाठी आलेल्या दोन युवकांचा जलाशयाच्या कालव्यात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवार २१ आॅगस्ट रोजी सायंकाळीच्या सुमारास उघडकीस आली. कादीर मतीन शेख (२८), कॅफ अमीन शेख (२१) दोघेही रा. सडक अर्जुनी जि. गोंदिया अशी मृतांची नावे आहेत. बुधवारी अनु. जाती, जमाती ंप्रवर्गाच्या वतीने भारत बंदची हाक देण्यात आली होती. या अनुषंगाने गोंदियासह सडक अर्जुनीतही बंद पाळण्यात आला. सर्वकाही बंद असल्याचे दिवस घालविणे व पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी शेख कुटुंबियानी सहलीचा बेत आखला. गोरेगाव तालुक्यातील चुलबंद जलाशय ठिकाणाची त्यांनी निवड केली व ते दुपारी कुटुंबियांसह सहलीला निघाले. चुलबंद जलाशयस्थळी पोहचल्यावर त्यांना आंघोळीचा मोह आवरता आला नाही.
महिला जलाशयाच्या गेटजवळ आंघोळ करीत होत्या तर दोघेही पुरुष जलाशयाच्या सांडव्याजवळ आंघोळीला गेले. दोघांपैकी एकाचा तोल कालव्यात गेला. डोह मोठा व खोल असल्याने त्यात बुडत असताना दुसरा वाचविण्यासाठी धावला. पण यात दोघांचाही मृत्यू झाला. पोलीस पाटील दिलीप मेश्राम व वनपरिक्षेत्र अधिकारी यांना घटनेची माहिती गोरेगाव पोलिसांना दिली. मात्र, घटनास्थळ डुग्गीपार पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने याची सुचना डुग्गीपार पोलिसांना देण्यात आली. पोलिस भारत बंदच्या आंदोलनात बंदोबस्तात असल्यामुळे सायंकाळी स्थानिक मासेमारांच्या मदतीने दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करून दोन्ही प्रेत उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. आज शवविच्छेदनानंतर प्रेत कुटुंबियांच्या सुपूर्द केल्यानंता सडक अर्जुनी येथील कब्रस्थानात अंत्यसंस्कार करण्यात आला.