भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : एसटी कामगारांना शासकीय कर्मचाºयांप्रमाणे वेतन मिळावे या प्रमुख मागणीसह इतरही मागण्या महाराष्ट्र एस. टी. कामगार संयुक्त कृती समितीकडून शासनाकडे करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २० आॅगस्टला बैठक आयोजित केली होती. परंतु ही बैठक काही कारण सांगून पुढे गेल्याने एसटी कामगार संतापले. कृती समितीच्या नेतृत्वात एसटी कामगारांनी नागपूरात रस्त्यावर उतरून पुन्हा मागण्यांकडे लक्ष वेधले. महाराष्ट्र एस. टी. कामगार संयुक्त कृती समितीकडून शुक्रवारी गणेशपेठ आगार परिसरात द्वारसभा घेण्यात आली. या आंदोलनात एसटीच्या सुमारे १३ संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. एस. टी. कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्या व एस. टी. कामगारांचे वेतन शासकीय कर्मचाºयांएवढे करण्यासाठी राज्यातील बहुतांश संघटनांची कृती समिती स्थापन करण्यात आली. या मागण्यांसाठी ३ सप्टेंबरला आंदोलनाचा निर्णय झाला आहे. त्याबाबत एसटी प्रशासनाला नोटीसही बजावण्यात आली आहे.