भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : नोकरीचे आमिष देऊन कित्येकांना गंडा घालण्यात येत असल्याचे प्रकार घडत आहेत. असे असतानाच औरंगाबाद पोलिस दलात शिपाई पदावर नोकरी लावून देण्याकरिता उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना नियुक्तिपत्र देण्यासाठी आलेल्या तोतया पोलिसाला डुग्गीपार पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.२३) ग्राम खोडशिवनी येथील रेल्वे स्थानक परिसरात करण्यात आली आहे. विलास नारायण गणवीर (६५, रा. किन्हीमोखे, ता. साकोली, जि. भंडारा) असे आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी डुग्गीपार येथील पोलिस हवालदार दीपक खोटेले यांना ग्राम खोडशिवनी रेल्वे स्थानक परिसरात एक व्यक्ती औरंगाबाद पोलिस दलात शिपाई या पदावर नोकरी लावून देण्याकरिता उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना नियुक्तिपत्र देणार आहे, अशी खात्रीशिर माहिती मिळाली. ही बाब त्यांनी वरिष्ठांना कळविली व वरिष्ठांच्या निदेर्शानुसार फिर्यादी वामन व्यंकटराव भुरे (रा. पालेवाडा) यांच्या मदतीने पोलिस निरीक्षक मंगेश काळे यांच्या नेतृत्वातील पथकाने ग्राम खोडशिवनी येथील रेल्वे स्थानक गाठून परिसरात सापळा लावला.
याप्रसंगी त्यांनी आरोपी विलास गणवीर याला ताब्यात घेऊन जेरबंद केले. त्याच्यावर डुग्गीपार पोलिसात भारतीय न्याय संहिता कलम २०४, २०५, ३१९(२), ३१८(४), ६२, ३३६(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक काळे, सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद बांबोळे, पोलिस हवालदार दीपक खोटेले, घनश्याम उईके, पोलिस नायक महेंद्र चौधरी, घनश्याम मुळे यांनी केली आहे. आरोपी विलास गणवीर याची चौकशी करून त्याच्याकडे असलेल्या बॅगची तपासणी केली असता बॅगमध्ये पोलिस अधिकाºयांची वर्दी, बनावट नेमप्लेट, पोलिस अधिकाºयाचे बनावट ओळखपत्र, औरंगाबाद पोलिस भरती उमेदवार प्रवेशपत्र, औरंगाबाद येथील मुख्य वैद्यकीय अधिकारी व पोलिस अधीक्षक यांचा शिक्का असलेले कागदपत्र, विद्यार्थ्यांचे मूळ टिसी, मार्कशिट, डोमेसाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, जात वैधता प्रमाणपत्र आदी मिळून आले.