भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : ‘गोविंदा आला रे..आला’ च्या तालावर नाचत-गात कितीही उंचावरील दहीहंडी फोडणाºया तरुणाईला बघणं, हा वेगळाच सोहळा. आनंद, धाडस, संघटन, अध्यात्म यांचा मिलाफ गोकुळाष्टमीतून दिसून येतो. गोकुळाष्टमीनिमित्त शहरातील विविध श्रीकृष्ण मंदिरांसह घरोघरी आज २६ आॅगस्टला श्रीकृष्ण जन्मोत्सवाची तयारी दिसून आली, तर उद्या दहीहांडी, गोपाळकाल्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीकृष्ण म्हणजे जीवन जगून, भोगून त्यातून निवृत्त होण्याचा महामंत्र. श्रीकृष्णाचे जीवन खरोखर लोकोत्तर. मात्र तमाम भारतीयांना भावते ते श्रीकृष्णाचे बाळरूप. ‘गोकुळाचा सखा, अंत:पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदाघरी, आनंदल्या नरनारी, गुढ्या-पताका-तोरणे करिती कथा, गाती गाणे, तुका म्हणे छंदे मन मोहिले आनंदे’ हा तुकाराम महाराजांचा अभंग या दिनी आठवतो. शहरात श्रीकृष्ण जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून, उद्या दहीहंडी व गोपाळकाल्याचा उत्सव रंगणार आहे.