भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : जुन्या पेन्शन प्रमाणे कर्मचारी, शिक्षकांना आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या आश्वासनाची शासनाने पूर्तता करण्यासाठी राज्य कर्मचाºयांनी पुन्हा बंडाचा एल्गार केला आहे. राज्य सरकारी, निम सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे कर्मचाºयांच्या रास्त मागण्यांसाठी गुरुवारपासून (दि. २९) बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय राज्यस्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. संघटनेच्या वतीने प्रसिद्धीदिलेल्या पत्रकानुसार, जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचाºयांनी मार्च २०२३ मध्ये सात दिवसांचा बेमुदत संप केला होता. सरकारने संपर्ककर्त्यांशी चर्चा करून संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना जाहीर केली. मात्र, आजतागायत शासनाने याबाबत शासन निर्णय किंवा अधिसूचना काढलेली नाही. त्यामुळे राज्यातील सुमारे साडेआठ लाख कर्मचारी, शिक्षकांमध्ये सुधारित पेन्शन योजना लागू करण्याबाबत शंका निर्माण झाली आहे. यासंदर्भात मुंबईत राज्यस्तरीय समन्वय समितीची नुकतीच बैठक पार पडली. त्यात चर्चेअंती गुरुवारपासून (दि. २९) बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.