भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : सर्व दु:ख आणि यातनातून मुक्ती देणारा माणसाच्या आयुष्यातील शेवटचा प्रवास म्हणजे अटळ असलेला मृत्यू होय, मात्र भंडारा तालुक्यातील बोरगावं बुज. येथील मृत झालेल्या प्रेतांचे अंतिम संस्कार करण्यासाठी स्मशानभूमीकडे जाणाºया रस्त्यावर चिखलच चिखल असल्याने चिखलातून वाट काढून प्रेत स्मशानभूमीत न्यावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे बोरगावं येथील माणसांची मरणानंतरही सुटका होत नसल्याची नागरिकांना खंत आहे. भंडारा तालुक्यातील बोरगावं बुज पुनर्वसन येथील अंत्यविधीशेड नवीन गावठाणापासून २ किमी अंतरावर असून पावसाळ्याच्या दिवसात संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. त्यामुळे गावातील मृत्यू झालेल्या प्रेतांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतांच्या कुटुंबातील सदस्य तसेच नातेवाईकांना २ किमीचे चिखल तुडवत अंत्यविधीसाठी पायपीट करावी लागते.
स्मशानभूमीचा रस्ता पूर्णत: चिखलाने माखला असल्याने कुठेही पाय ठेवला तरी चिखलातच जातो, अशी अवस्था रस्त्याची झाली आहे. मृत्यू कुणालाही चुकत नाही. हे शास्वत सत्य असून जन्माला आलेल्या प्रत्येकालाच मृत्यूला सामोरे जावे लागते. त्यामुळे आयुष्यभर जगण्यासाठी धडपडणाºया व्यक्तीचा शेवट तरी चांगला व्हावा अशीच कुटुंबाची इच्छा असते. मात्र बोरगावं येथील स्मशानभूमीच्या चिखलमय रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्था झाली असून रस्त्यावर पसरलेल्या चिखलातून मृतदेह न्यावे लागतात . त्यामुळे अंतिम प्रवासाकडे जाणारा रस्ताच चिखलमय झाल्याने नागरिकांना जिवंतपणे तर मृत पावलेल्या शरीराला मृत्यनंतरही यातना भोगाव्या लागत असतील, तर प्रशासनाच्या नावाने पित्र घालण्याची वेळ आली असल्याच्या संतप्त प्रतिक्रीया नागरिकांमधून उमटत आहेत.