भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूणार्कृती पुतळा कोसळल्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा उभारण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे तुमसर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सन २०२३ मध्ये मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूणार्कृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. परंतु या कामाला एक वर्ष पूर्ण झालेले नाही. त्यातच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली. यावरून हे काम किती निकृष्ट दर्जाचे होते, याची प्रचिती येते.
छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदूस्थानाचे आराध्य दैवत आहेत. तरी देखील सरकारने त्यांच्या पुतळ्याच्या कामात हलगर्जीपणा व चालढकलपणा करून निकृष्ट दर्जाचे काम केले. सदर पुतळ्याचे काम नियमानुसार, इस्टीमेटप्रमाणे, भौगोलिक बाबींचा विचार करून झाले असते तर आज अशी घटना घडली नसती अशी भूमिका शिवसेनेने मांडली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रमुख अॅड रवि वाढई, युवासेनेचे जिल्हा समन्वयक मनोज चौबे, स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच मेश्राम तसेच शिवसैनिक उपस्थित होते.