भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आठ महिन्यांपूर्वी लोकार्पण केलेला पुतळा कोसळल्यानंतर राज्य सरकारवर या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार केल्याचे आरोप होत आहेत. या घटनेवरून विरोधक आक्रमक झालेले असतानाच घटनेच्या चार दिवसांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी जाहीर माफी मागितली आहे. नरेंद्र मोदी आज (३० आॅगस्ट) महाराष्ट्र दौºयावर आले होते. दुपारी त्यांनी पालघर येथील वाढवण बंदराचे भूमिपूजन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी सिंधुदुर्ग येथील घटनेवर प्रतिक्रिया दिली. तसेच घडलेल्या दुर्घटनेबद्दल सर्व शिवभक्तांची जाहीर माफी देखील मागितली. मोदींच्या माफीनंतर विरोधक राज्य सरकारच्या माफीची व मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना ते म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माफी मागण्याची गरज का पडली? कारण त्यांनी चूक केली आहे आणि मोदींनी त्यांची चूक आता मान्य केली आहे.
मोदींसह सत्ताधाºयांनी चूक मान्य केली असेल तर त्यांनी काही गोष्टी तपासून बघायला पाहिजे होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला, त्या स्मारकाचा पाया व्यवस्थित होता का? चबुतरा व्यवस्थित होता का? मूर्ती मजबूत होती की नाही? या पुतळ्याला राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाने प्रमाणपत्र दिलं होतं का? पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी या गोष्टी तपासायला पाहिजे होत्या. त्यांच्या विभागाने देखील या गोष्टींची तपासणी करायला पाहिजे होती’. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले, पेशव्यांच्या काळातही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला जात होता आणि आता शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाºया पेशव्यांनी सुद्धा पुन्हा एकदा महाराजांचा अपमान केला आहे. त्यामुळे माफीने हा प्रश्न सुटणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार या लोकांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेस पोहोचवली आहेत. त्यामुळे या लोकांनी सत्तेतून बाहेर व्हावं, नाहीतर राज्यातील जनता त्यांना सत्तेतून बाहेर खेचल्याशिवाय शांत बसणार नाही.