भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा : पोलीस स्टेशन सिहोरा अंतर्गत असलेल्या सोनेगाव/ सिहोरा झुडपी जंगलातून अवैधरित्या कत्तलखान्याकडे नेत असलेल्या १७ जनावरांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जीवनदान दिले असून त्या १७ जनावरांची लाखनीच्या गौशाळेत रवानगी करण्यात आली आहे. सदर प्रकरणी पोलीस स्टेशन सिहोरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील अनेक वषार्पासून सोंड्या टोला डॅम मार्ग मध्य प्रदेशातून दर दिवशी पायदळ व पिकप वाहनात भरून सिहोरा, खापा मोहाडी, टेमनी, दावेझरी तर कधी हरदोलीच्या झुडपी जंगलात बांधून ठेवत रात्रीच्या वेळी पिकप वाहनामध्ये भरून निर्दयतेची वागणूक देत नागपूर व कामठीच्या कत्तल खान्यात पाठविले जाते.
रविवारी १ सप्टेंबर रोजी दु.१ ते २ च्या सुमारास बजरंग दल कार्यकर्ता सुधीर नेमा हे परिसरात फेरफटका मारीत असतांना १७ जनावरे अवैध रित्या चारा व पाण्या विना झुडपी जंगल परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी बांधून ठेवल्याचे निदर्शनास आले असता सुधीर नेमा यांनी सिहोरा पोलिसांना सूचना दिली. माहिती मिळतच सिहोरा पोलिसांची चमू घटना स्थळावर दाखल झाली व घटनेचा पंचनामा करून आरोपी शशिकांत लाखडे सोनेगाव निवासी तथा बाबु शेख यांचेवर पशु क्रूरता अधिनियम ११ (१) (एफ.) (एच.)१९६० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला व त्या १७ जनावरांना ज्ञान फाउंडेशन गराडा लाखनी येथील गौशाळेत पाठविण्यात आले आहे.त्या १७ जनावरांची किंमत १ लाख ७० हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे.