भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शिक्षण विभाग भंडारा च्या वतीने भंडारा पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दवडीपार (बेला) येथे कार्यरत सहाय्यक शिक्षक अरविंद गणेश बारई यांना जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान करून त्यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला. त्यांनी हा पुरस्कार आपल्या विद्यार्थ्यांना समर्पित केला. अरविंद बारई यांनी २००३ पासून त्यांच्या सेवाकाळात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता विविध सहशालेय उपक्रम राबविले आहेत. त्यांना कॅसिओ, हलगी, साईड ड्रम, बँड इत्यादी विविध वाद्य वाजविण्याचा छंद असून शाळेतील विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांनी प्रशिक्षित केले. शाळेत ते संगीतमय परिपाठ, लेझीम पथक, संगीतमय पी.टी. इत्यादी उपक्रम राबवतात. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच शिष्यवृत्ती, नवोदय इत्यादी स्पर्धा परीक्षांचे ज्यादा तासाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.
विशेष म्हणजे फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतील विद्यार्थिनी कु. परिधी ज्ञानेश्वर वैद्य तालुक्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीधारक झाली. तसेच जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा शाळेच्या विद्यार्थ्यांनी रीले रेस या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. इतर सहशालेय उपक्रमामध्ये शैक्षणिक सहल, वृक्षारोपण, निसर्ग शाळा, परिसरभेट स्नेहसंमेलन बाल आनंद मेळावा, लोकवर्गणीतून शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ण करणे, तंबाखू मुक्त शाळा, सुंदर हस्ताक्षर, खेळांमध्ये विद्यार्थी सहभाग इत्यादी उपक्रम त्यांच्या शाळेवर राबवत असतात. अरविंद बारई यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जि. प. अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, जनता शिक्षक महासंघ राज्य उपाध्यक्ष डॉक्टर उल्हास फडके, राज्यसचिव अनिल शिवणकर, जिल्हा पालक कैलास कुरंजेकर, जि.प. सदस्य यशवंत सोनकुसरे, प्रेम वनवे, पंचायत समिती सभापती सौ. रत्नमाला चेटूले, गटविकास अधिकारी डॉक्टर संघमित्रा कोल्हे, गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड, शिक्षण विस्तार अधिकारी शिल्पा निखाडे, केंद्रप्रमुख रवींद्र फंदे, मुख्याध्यापक दशरथ जिभकाटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर वैद्य, सरपंच मुन्ना बांते आदींनी अभिनंदन केले.