भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : दि. १० सप्टेंबर रोजी तिरोडा तालुक्यात प्रवेश करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शिवराज्य यात्रेत तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील स्वाभिमानी शिलेदारांनी सामिल व्हावे असे आवाहन रविकांत बोपचे यांनी ७ सप्टेंबर रोजी तिरोडा येथील हॉटेल सहयोग येथे झालेले पत्रकार परिषदेत केले आहे. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे गोंदिया जिल्हा कार्याध्यक्ष राघवेंद्र बैस, तालुका अध्यक्ष हेमराज अंबुले, विधानसभा अध्यक्ष ओम प्रकाश रहांगडाले, शहर अध्यक्ष रवींद्र वंजारी, युवक काँग्रेस अध्यक्ष रवीकूमार धूर्वे, महिला काँग्रेस अध्यक्षा भाग्यश्री केळवतकर, महिला कार्याधक्ष झायाताई टेकाम आदी उपस्थित होते.
याप्रसंगी रविकांत बोपचे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार तर्फे महाराष्ट्र स्वाभिमानाचा या बॅनरखाली स्वराज्याच्या रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी ९ आॅगस्ट रोजी राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीवार्दाने पावन भूमी शिवनेरी किल्ला जुन्नर जिल्हा पुणे येथून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे, डॉक्टर अमोल कोल्हे, माजी गृहमंत्री आमदार अनिल बाबू देशमुख, राजेश टोपे, रोहित पवार यांचे नेतृत्वात निघालेली शिवराज्य यात्रा संपूर्ण राज्यात फिरणार असून मंगळवार दिनांक १० रोजी तिरोडा तालुक्यातील नवेगाव येथून प्रवेश करत असून नवेगाव येथे यात्रेतील मान्यवरांचे स्वागत करुन मोटार सायकल रॅलीसह बिरसी फाटा येथून आणखी काही कार्यकर्ते मोटार सायकलसह या रॅलीत सहभागी होऊन तिरोडा शहरात प्रवेश करताच सुकळी नाका येथून सुमारे ८०० मोटार सायकल स्वा- रासह रॅली तिरोडा शहरात भ्रमण करून गोंदिया मार्गावरील ड्रीम गार्डन लॉन येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभेला तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील जवळपास ४००० लोक हजर राहणार असल्याची माहिती रविकांत बोपचे यांनी पत्रकार परिषदेत दिली असून जनतेने लोकसभेत महाविकास आघाडीचे पारड्यात मते देऊन भरघोस यश दिल्याने येत्याविधानसभेतही जनता महाविकास आघाडीचे उमेदवारांना पसंती देणार असल्याने राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येण्याचा आशावाद व्यक्त करत अजून पर्यंत जागा वाटपाबाबत वरिष्ठांनी कोणताही निर्णय घेतला नसून तिरोडा विधानसभा क्षेत्रात वरिष्ठांनी आपल्यावर विश्वास दाखवून उमेदवारी दिली तर आपण ही निवडणूक नक्कीच लढवू व जिंकू अथवा वरिष्ठ जो निर्णय घेतील व ज्यांना उमेदवारी देतील त्यांचे करता आपण पूर्ण शक्तीनिशी काम करू असे सांगितले. तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील जास्तीत जास्त शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता व नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन रविकांत बोपचे यांनी केले आहे.