भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- गोंदिया विधानसभाचे कॉग्रेस पक्षात गेल्या २५ वषार्पासून नेतृत्व केलेले आणि मागील २०१९ च्या निवडणुकीत भाजप पक्षात ऐनवेळी प्रवेश करून कमळ चिन्हावर निवडणुकीत पराभूत झालेले माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी रविवार ८ सप्टेंबर रोजी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिला असून पुढील १३ सप्टेंबर रोजी कॉग्रेस पक्षात कॉंग्रेसचे महाराष् प्रभारी रमेश चेनिथल्ला, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या उपस्थित प्रवेश करणार असल्याची माहिती माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी गोंदिया येथील प्रताप लॉन येथे आयोजित पत्रपरिषदेत दिली. काही दिवसापूर्वी गोंदिया चे माजी आमदार रमेश कुथे यांनी पण भाजपला रामराम ठोकत शिवसेना उबाठा गटात प्रवेश केला होता हे विशेष उल्लेखनीय.. पत्र परिषद प्रसंगी काँग्रेस चे देवरीचे आमदार सहेसराम कोरेटी, गोंदिया जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिलीप बंसोड, काँग्रेस प्रदेश सचिव अमर वराडे, पी.जी. कटरे, विनोद जैन, गप्पु गुप्ता, प्रकाश रहमतकर, राकेश ठाकुर आदि व्यासपीठावर उपस्थित होते. गोंदिया विधानसभा येथील माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस मधून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र मागील काही दिवसापासून माजी आमदार गोपालदास अग्रवाल हे पुन्हा काँग्रेसमध्ये घर वापसी करणार असल्याचे संकेत राजकीय वर्तुळातून मिळत होते.
पुढे गोपालदास अग्रवाल म्हणाले की पाच वर्षापूर्वी २०१९ मध्ये गोंदियाच्या विकासाला नविन दिशा देण्याच्या उद्देशाने तसेच गोंदिया विधानसभेत कमळ फुळविण्याच्या उद्देशाने आणि भाजपच्या वरिष्ठांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या प्रलोभनाला बळी पडत मी भाजप प्रवेश केला होता. पण मागील निवडणुकीत ऐनवेळी माझा भाजप प्रवेशामुळे कार्यकर्ते तसेच गोंदिया विधानसभेच्या जनतेनी त्याना न आवळलेला निर्णय करित निवडणुकी मला पराभवाला समोरे जावे लागले होते. आणि गोंदियात कमळ फुलविता आले नाही. तरी पण मागील लोकसभा निवडणुकी आणि या पूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजपचे इमाने इतबारे काम केले आणि उमेदवार निवडणून आणले होते. सगळे सुरळीत सुरू असतांना राज्यात झालेल्या सत्तांतरा नंतर जिल्हयातील परिस्थिती बदलत गेली आणि महायुती शासनाने स्थानिक अपक्ष आमदाराला भरपूर निधी देवून माझेच खच्चीकरण करण्याचा चालविलेला प्रयत्न यामुळे मागील तीन महिण्यापासून राज्यातील पक्ष नेतृत्वाला या संदर्भात वारंवार सांगून सुद्धा काहीही फरक पडत नसल्याचे बघून मी ८ सप्टेंबर ला भाजपच्या प्राथमिक सदस्यतेचा राजीनामा देत असून पुढील १३ सप्टेंबर रोजी काँग्रेस पक्षात प्रवेश करून घरवापसी करित असल्याचे सांगितले. तसेच महाविकास आघाडी अंतर्गत गोंदिया विधानसभेची जागा ही कॉग्रेस पक्षच लढणार या बाबतची शाश्वती पक्षातील वरिष्ठांनी दिली आहे. सध्या महाराष्ट्र राज्यातील निवडणुकीची घोषणा करण्यात आली नाही त्यामुळे त्यावेळी या सगळ्या बाबींवर सविस्तर पणे आपण खुलासा करणार असल्याचे ही आमदार गोपालदास अग्रवाल यांनी पत्रपरिषदेत सांगितले. गोपालदास अग्रवाल म्हणाले की लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार पराभूत झाला असला तरी त्याला गोंदिया विधानसभेतून ३५५०० मतांची आघाडी मिळवून दिली असल्याचे त्यांनी सांगितले.