भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : एका राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्याच्या मालकीच्या आॅडी कारने शहरात मध्यरात्री हैदोस घातला. दुचाकी आणि चारचाकीसह तब्बल पाच वाहनांना धडक देत चालक पळून गेला. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही. परंतु, धडक बसलेल्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन चालकासह दोघांना ताब्यात घेतले आहे. ही आॅडी कार एका राजकीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या मालकीची असल्याची माहिती आहे. ती घेऊन चालक अर्जून जितेंद्र हावरे (२४) आणि त्याचा मित्र रो-ि हत चिंतमवार (२७) हे दोघेही रविवारी मध्यरात्री बाहेर निघाले. अर्जून हा भरधाव कार चालवत होता. संविधान चौकात एक दुचाकीस्वार या कारच्या धडकेपासून थोडक्यात बचावला. दुचाकीस्वार खाली पडला. त्यानंतर ही कार काचीपुरा ते जनता बाजार रोडवरुन भरधाव जात होती. रामदास पेठेतील सेंटर पॉईट हॉटेलसमोर उभ्या असलेल्या एका कारला आॅडीने मागून धडक दिली. त्यानंतर समोर असलेल्या तीन दुचाकींना धडक देऊन कारचालक पळून गेला. ती कार जवळपास १५० किमी वेगाने धावत होती.
अपघातग्रस्त कार चालकाने आरडाओरड केल्यामुळे लोकांची गर्दी गोळा झाली. कारचालकाने सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्याने दिलेल्या लेखी तक्रारीवरुन सीताबर्डी पोलिसांनी अपघाताचागुन्हा दाखल करुन अर्जून हावरे आणि रोहित चिंतमवार या दोघांना ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस करीत आहेत. पोलिसांवर दबाव ? या प्रकरणात पोलिसांवर दबाव असल्याचे दिसून येते. या संदर्भात सीताबर्डी ठाण्याचे ठाणेदार चंद्रशेखर चकाटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आॅडी कार नेमकी कुणाच्या नावावर आहे, ही माहिती काढण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाला पत्र देण्यात आले आहे. त्यांच्याकडून माहिती आल्यानंतर कारच्या मालकाबाबत सांगता येईल. परंतु, आरोपी चालक अर्जून हावरे हा संकेत बावनकुळे यांचा मित्र आहे. दरम्यान अपघात होऊन १६ तासांचा वेळ गेल्यानंतरही सीताबर्डी पोलिसांना कारच्या मालकाबाबत माहिती न मिळल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. तसेच कारचा क्रमांक आणि अन्य माहिती देण्यापूर्वीच चकाटे यांनी दूरध्वनी बंद केला. त्यावरुन सीताबर्डी पोलिसांवर दबाब असल्याचे दिसून येते.
सीसीटीव्ही फुटेज प्रसारित
कार चालक अर्जून हावरेने एका उभ्या कारला धडक दिल्यानंतर पळून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज समाज माध्यमांवर प्रसारित झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरुन आॅडी कार जप्त करुन पोलीस ठाण्यात ठेवली आहे. मात्र, आश्चयार्ची बाब म्हणजे आॅडी कारची नंबर प्लेट काढण्यात आलेली आहे. त्यावरुन सीताबर्डी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.