मुसळधार पावसामुळे भामरागडचा संपर्क तुटला

भंडारा प्रतिनिधी/प्रतिनिधी गडचिरोली : रविवारी दक्षिण गडचिरोलीला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. रात्रीतून झालेल्या जोरदार पावसाने भल्या पहाटेच भामरागडमध्ये पर्लकोटा नदीला पूर आला. त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. दुकानांत पाणी शिरल्याने लगबगीने ५० कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. नदी-नाले ओसंडून वाहत असून आलापल्ली- भामरागड महामार्ग पाण्याखाली गेला, त्यामुळे भामरागडचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात रविवारी सर्वत्र पावसाने हजेरी लावली. मात्र, दक्षिण गडचिरोलीत मध्यरात्री पावसाचा जोर वाढला. त्यामुळे भामरागडमध्ये पर्लकोटा नदी तुडुंब भरून वाहिली. पहाटे पूल पाण्याखाली गेला, पाण्याचा दाबवाढून ते थेट बाजारात शिरले. त्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली. अनेकांनी साहित्य तातडीने दुसरीकडे हलविले.

प्रशासनाने तत्परता दाखवत डॉ. आंबेडकर वॉडार्तील ५० कुटुंबांना तात्पुरत्या स्वरूपात दुसरीकडे स्थलांतरित केले. मुलचेरा-आष्टी, आलापल्ली-भामरागड, आलापल्ली-सिरोंचा हे मार्ग पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यात सरासरी ४७.२ मि.मी. नोंद झालेली असली तरी एकट्या भामरागड तालुक्यात १७४. ५ मि. मी इतका पाऊस झाला आहे. दुचाकीसह दोघे पुरात वाहून गेले, झाडाच्या फांदीने तारले भामरागडहून एटापल्ली येथे मोटारसायकलने जात असताना ताडगावजवळ वटेली नाल्यावर अचानकपणे पाण्याचा प्रवाह वाढला. यावेळी पशुधन विकास अधिकारी नितीन विजयकुमार काळे (३०,रा. तोडसा) व बँक अधिकारी तिरुपती शंकर चापले(३०,रा. पंदेवाही) हे दोघे दुचाकीसह वाहून गेले. १०० फूट अंतरावर एक झाडाच्या फांदीला पकडून दोघांनी मदतीसाठी याचना केली. यावेळी नागरिकांनी माणूसकी दाखवत तत्परतेने तरुणांना पाचारण केले. यावेळी आसरा फाउंडेशनचे शंकर हलदार, प्रकाश आत्राम, सुनील मडावी, मनोज महालदार, किंकर मिरदा यांनी त्यांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *