भंडारा पत्रिका / प्रतिनिधी यवतमाळ : मारेगाव तालुक्यातील वनोजादेवी येथील बस थांब्याजवळ सुरू असलेले देशी, विदेशी दारूचे अवैध दुकान गावातील महिलांनीच पेटवून दिले. पोलीस, ग्रामपंचायतीला वारंवार विनंती करूनही या दुकानावर कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी रविवारी सायंकाळी या दुकानात शिरून तेथील दारू व इतर साहित्य पेटवून दिले. या घटनेने खळबळ उडाली. वनोजादेवी येथे बस थांब्याजवळ अवैध दारू विकली जात असल्याने गावातील अनेक कुटुंबे व्यसनाधीनतेमुळे उद्ध्वस्त झाली.
त्यामुळे गावातील महिलांनी एकत्र येत हे दुकान गावातून हटवण्याची मागणी वारंवार प्रशासनाकडे केली. मात्र त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. दारू विक्रेता मुजोरी करून दारू विकत होता. रविवारी या दुकानात नेहमीपेक्षा अधिक ग्राहक होते. याची माहिती मनसेच्या महिला तालुका प्रमुख उज्वला चंदनखेडे, वनोजा येथील मनसे युवाध्यक्ष रोशन शिंदे, सीमा शिंदे, उज्ज्वला ढोके यांना मिळाली. त्यांच्या नेतृत्वात अनेक महिलांनी या दारू दुकानावर धाव घेतली. संतप्त महिला बघताच अवैध दारू विक्रेता चंद्रकांत सुधाकर भोसले (रा. नांदेपेरा, ता. वणी) हा घटनास्थळी मुद्देमाल सोडून पळून गेला. यावेळी महिलांनी देशी दारूच्या ५२ आणि विदेशी मद्याच्या सहा बॉटल ताब्यात घेत दारूच्या दुकानास आग लावली. घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी शोधमोहीम राबवून आरोपी चंद्रकांत भोसले, त्याचा सहकारी उतेश हरिश्चंद्र चांदेकर (रा. मजहरा) यांना ताब्यातघेत त्यांच्यविरोधात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. सोबतच देशी दारूच्या ३४ बॉटलही जप्त केल्या.