भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर ते सिकंदराबाद दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ही गाडी मंगळवार वगळता दररोज धावणार आहे. सध्या नागपूरला पोहोचण्यासाठी प्रवासाला ८ तास लागतात; मात्र, नवीन वंदे भारत एक्स्प्रेसला ७ तास १५ मिनिटे लागतील. ही गाडी नागपूरहून पहाटे ५ ला निघेल आणि दुपारी १२.१५ ला सिकंदराबादला पोहोचेल. या गाडीला सेवाग्राम, चंद्रपूर, बल्लारशाह, रामागुंडम आणि काझीपेठ स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस परतीच्या प्रवासात सिकंदराबादपासून दुपारी १ वाजता निघेल आणि नागपूरला रात्री ८.२० वाजता पोहोचेल. या गाडीच्या वेळात थोडाफार बदल केला जाऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थित नागपूर येथे १५ सप्टेंबर २०२४ रोजी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. परंतु, अजून कार्यक्रम अंतिम झालेला नाही. रेल्वेतर्फे लवकरच यासंदर्भात पत्रकार परिषद आयोजित करून सविस्तर माहिती देण्यात येईल, असे मध्य रेल्वेचेविभागीय वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी सांगितले. वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेकडून चालवल्या जाणाºया आणि व्यवस्थापित केलेल्या आधुनिक गाड्यांपैकी एक आहे. ही देशातील अर्धद्रुतगती गाडी आहे. ती उच्चकार्यक्षमता, इलेक्ट्रिक मल्टीयुनिट ट्रेन आहे. चेन्नईतील सरकारी मालकीच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीकडून (आयसीएफ) तिची रचना आणि निर्मिती केली गेली.