भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तिरोडा बस स्थानकासमोर एक आयशर वाहन थांबवून तपासणी केली असता या वाहनात १४ गोवंशीय जनावरे कत्तलीकरिता घेवुन जात असल्याचे दिसून आल्याने सदर वाहन व चालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे तिरोडा पोलीस सूत्रांनी दिलेले माहितीनुसार ८ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तिरोडा पोलीस निरीक्षक अमित वानखडे यांचे सुचनेवरून उपनिरीक्षक तेजस कोंडे यांनी तिरोडा बस स्थानका समोर गोंदियाकडून येत असलेले लाल रंगाचे आयशर वाहन क्रमांक एम . एच. ३७ टी ३११४ थांबवून या वाहनाची तपासणी केली असता वाहनांमध्ये १४ गोवंशीय जनावरे किंमत १ लक्ष ३० हजार रुपये जनावरांची बसण्याची व चारा पाण्याची कुठलीही व्यवस्था न करता वाहून नेत असल्याने चालकाकडे याबाबत परवाना मागितला असता त्याने आपल्याकडे कुठलाही परवाना नसल्याचे तसेच हे वाहन ज्ञानेश्वर मारुती सावंगी यांचे असल्याचे सांगितले.
तिरोडा पोलिसांनी वाहन चालक शेख सिकंदर शेख शौकत राहणार उपरा सेलू बाजार मंगरूळपीर जिल्हा वाशिम यास वाहनासह ताब्यात घेऊन फिर्यादी पोलीस शिपाई सुर्यकांत खराबे यांचे तक्रारीवरून प्राण्यांच्या छळ प्रतिबंधक अधिनियम कलम ११ (१)(ड)(ई), महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम कलम ५,६,९ नुसार गुन्हा नोंद करून १४ जनावरे किंमत १ लक्ष ३० हजार व वाहन किंमत ५ लक्ष असा एकूण ६ लक्ष ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास उप पोलीस निरीक्षक तेजस कोंडे करीत आहे.