भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मोहाडी : शिक्षकांच्या विचारात सका- रात्मकता आशावाद असला पाहिजे. शिक्षकांनी कोणतेही कारणे न सांगता प्रत्येक संकटांवर मात केली पाहिजे. स्वत:ला घडविण्याची उत्तुंगतेची आस असली पाहिजे. तरच चांगले विद्यार्थी घडविले जाऊ शकतात. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी समर्पित झालेले शिक्षक मुबारक सय्यद कुठेही गेले तर परिसाचे सोनेच करतात. त्यांनी विद्यार्थ्यांच्या तनमनात संस्कार अन् विश्वास ठासून भरला असल्यामुळे एका वर्षातच कॉन्व्हेंट पासून शहराकडे जाणारी छोटी पाऊले पारडी गावच्या शाळेत वळती झाली आहेत. अलीकडे प्रत्येक खेड्यातील बालक शहरात असलेल्या कॉन्व्हेंटकडे चालती होत आहेत. त्यामुळे खेड्यात असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना गळती लागली आहे. पारडी या गावात उलटच दिसून येत आहे.
या गावातील पालकांनी आपली मुले शहरात असलेल्या कॉन्व्हेंट मध्ये न पाठवता गावातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नाव दाखल केले आहे. एवढेच नव्हे तर पारडी गावच्या आजूबाजूला असलेल्या खेड्यातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्या शाळेत आपल्या मुलांना प्रवेश देण्यासाठी उलटा प्रवास सुरू केला आहे. आश्चर्य तेवढेच अशक्य कोटीतील वाटणारा हा दुर्मिळ अनुभव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी येथे एका वर्षातच बघायला मिळत आहे.
मोहाडीच्या कॉन्व्हेंटमध्ये शिकणारे विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमात असलेल्या पारडीच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेतला आहे. तथापि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची वर्ग खोल्यांची क्षमता आणि विद्यार्थी शिक्षकांची रिक्त पदे असल्याने ‘थोडे थांबा’ असे सांगून येथील मुख्याध्यापक मुबारक सय्यद यांनी नवीन विद्यार्थ्यांचा यावर्षी पुरता प्रवेश थांबवला. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना खेळाचे गणवेश, सुशोभित वर्ग खोल्या, स्वतंत्र मुख्याध्यापक कक्ष, डिजिटल क्लासरूम, वाचन कुटी आदी सुविधा एका वर्षातच निर्माण करून दिल्या आहेत. शाळेत दररोज विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती ठेवण्याची पालकांनी जबाबदारी घेतली आहे. आॅनलाइन अभ्यास प्रणाली जिल्हा परिषदच्या पारडी येथील शाळेने सुरू केली आहे.
प्रत्येक पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल असून त्याच्या वापर अभ्यास साठी दररोज केला जातो. विद्यार्थ्यांच्या गृह अभ्यासासाठी प्रत्येक वार्डात अभ्यास वर्ग तयार करणे आले. टीव्ही व मोबाईलच्या वापर केवळ अन् केवळ शैक्षणिक कायार्साठी केला जात आहे. या शाळेत दररोज आदर्श परिपाठ घेतला जातो. यात मराठी , इंग्रजी व हिंदी भाषेत परिपाठ होत असतो. सामान्य ज्ञान स्पर्धा, परीक्षा वर्ग तसेच मी इंग्रजीतबोलणार आदी उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. पालक व गावकºयांनी खर्रा, गुटखा, दारूचे व्यसन दूर राहावे यासाठी विद्यार्थ्यांनी घरातूनच मोहीम सुरू केली आहे.