तिरोडा : सोमवार दि. ९ सप्टेंबर चे रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे तिरोडा शहरासह ग्रामीण क्षेत्रात सखोल भागात पाणी साचून अनेक घरात पाणी गेले तर रस्त्यावरील नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने अनेक मार्गही बंद झाले असून या पावसामुळे तिरोडा तालुक्यातील जनजीवनविस्कळीत झाले आहे. तसेच संततधार पाऊस सुरूच असल्याने आणखीही कठीण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे संपूर्ण तिरोडा तालुक्यात दि. ९ सप्टेंबर चे संध्याकाळपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस रात्रभर सुरूच होता तर मंगळवार १० सप्टेंबरला सकाळपर्यंत तिरोडा तालुक्यातील पाच मंडळात सरासरी ६४.३६ पावसाची नोंद करण्यात आली असून यात तिरोडा ३६.४, परसवाडा ७०.२, मुंडीकोटा ४०, वडेगाव ६०.२ व ठाणेगाव ६९ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून या संततधार पावसामुळे तिरोडा -गंगाझरी -गोंदिया, तिरोडा साकोली, तिरोडा -करडी मार्गे भंडारा, तिरोडा- इंदोरा खुर्द -मंगेझरी, इंदोरा खुर्द -बरबसपूरा, तिरोडा -धादरी -उमरी मार्ग नाल्यांना पूर आल्यामुळे बंद झाले होते.
यापैकी तिरोडा- साकोली व तिरोडागंगाझरी मार्गे गोंदिया मार्ग दुपारी सुरू झाले असले तरी इतर भागातील नाल्यांचे पाण्याची पातळी वाढत असल्याने आणखीही काही मार्ग बंद होण्याची शक्यता असून या संततधार पावसामुळे तिरोडा बसस्थानकाचे तीनही गेटवर मोठ्या प्रमाणात पाणी साचून प्रवाशांना येजा करण्यास अडचण जात होती. तर बस चालकनांही कसरत करुन बस काढाव्या लागत होत्या. मात्र आगार व्यवस्थापना कडून ही गैरसोय दुर करण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात येत नसल्याने संताप व्यक्त करत नाइलाजाने प्रवाशांना बसस्थानकावर ऐजा करावी लागत होती. तर शिक्षणाधिकारी गोंदिया (माध्यमीक) यांनी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केल्याने शाळा बंद होत्या, १० सप्टेंबरलाही संततधार पाऊस सुरूच असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.