भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : कालपासून जिल्हाभरात झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सुरक्षित उपाय योजना म्हणून आज शाळा महाविद्यालयांना जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये सुट्टी देण्यात आली आहे. आज सकाळी जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी घेतला. गणेशपुर, भोजापूर, दवडीपार, टाकळी जमनी, पंप हाऊस येथे डॉ. कोलते यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पूर परिस्थितीची पाहणी केली.
जिल्ह्यात काल अतिवृष्टी झाली. त्यामध्ये नाका डोंगरी तालुका तुमसर येथे ६१.८० मिलिमीटर पाऊस झाला. नदीच्या पुराचे पाणी घरात शिरल्याने व खबरदारीच्या दृष्टीने कारधा येथील चार, गणेशपूर येथील आठ, पवनी तालुक्यातील पवना खुर्द येथील एक कुटुंब स्थलांतरित करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. लाखांदूर तालुक्यातील खोलमारा येथे जिल्हा शोध व बचाव पथकामार्फत बचाव कार्य करण्यात आले असून त्याद्वारे गरोदर महिलेस सह ७ नागरिकांना सुरक्षित स्थळी हरवण्यात आले. हवामान विभागा द्वारे आज जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सर्व क्षेत्रीय अधिकाºयांनी सतर्क राहण्याची निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कोलते यांनी दिले आहेत.