भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची दणादाण झाली असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी मध्यरात्रींपासून पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे नेहमी घरे सोडून जाण्यापेक्षा पुराच्या पाण्यात जलसमाधी घ्यावी काय? असा पुरपीडित नागरिकांनी सवाल केला आहे.
भंडारा शहरालगत गणेशपुर ग्रामपंचायतच्या हद्दीत
दरवर्षी वैनगंगा नदीला येणाºया बॅक वॉटर पुराने जुन्या रेल्वेच्या पुलाखालून सत्कार नगर, नेहरू वॉर्ड, आंबेडकर वॉर्ड, जुना नागपूर नाका परिसरात पुराचे पाणी झपाट्याने वाढले, सततधार पावसाने वैनगंगेने २४६.५४ मिटर पेक्षा जास्त धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे गणेशपूर हद्दीतील लोकवस्तीत पुराचे पाणी घरात शिरले व घराबाहेर पडण्याचे मार्ग बंद झाले. त्यामुळे नागरिकांना घरे सोडून दुसरीकडे पलायन करण्याच्या प्रशासनाने सूचना दिल्या आहेत. वारंवार पुराच्या पाणी घरात शिरत असल्याने ऐच्छिक पुनर्वसन करण्याची नागरिकांची मागणी आहे.
मात्र प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे नागरिकांना दरवर्षी पुराचा सामना करावा लागतो. २४ जुलै आणि आता ११ संप्टेंबरला दोनदा पूर आले. त्यामुळे किती वेळा घरे सोडून इतरांत्र आसरा घ्यावे, असा नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाने भंडारा शहराला सुरक्षित करण्यासाठी सुरक्षाभिंत बांधली, मात्र गणेशपुर हद्दीतील नेहरू वार्ड, सत्कार नगर, आॅबेडेकर वॉर्ड व जुना नागपूर नाका परिसरातील नागरिकांना वाºयावर सोडले. त्यामुळे नेहमी घरे सोडून जाण्याच्या कटकटीतून वाचण्यासाठी कुटुंबासह पुराच्या पाण्यात जलसमाधी घ्यावी काय? असा संतप्त सवाल पूरपिडीत नागरिकांनी केला आहे.
जनावरांनाही पुराचा फटका
भंडारा : मंगळवारी मध्यरात्री पासून वैनगंगेचा वाढत असलेल्या पाण्यामुळे जुना नागपूर नाका परिसरातील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले असून नागरिकांची दाणादान झाली असतांना गाई म्हशीना सुद्ध या पुराचा फटका बसला असून पुराचे पाणी वाढल्यामुळे गाई – म्हशी पुराच्या पाण्यात फसल्या आहेत.