भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यात सलग दोन दिवस- ांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून जिल्ह्यात पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली आहे. सध्या कारधा येथे वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडून दीड मीटरवरुन नदीचे पाणी वाहत आहे. मध्य प्रदेशातील संजय सरोवरची ४, पुजरीटोला ८ आणि गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा धरणाची सर्व दारे उघडण्यात आली असून सातत्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. २०२० आणि २०२२ मध्ये आलेल्या महापुरासारखी स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. भंडाºयाला जोडणारा ब्रिटिशकालीन पूल वैनगंगा नदीच्या पाण्याखाली गेला आहे. पुलावरुन दीड फुटावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे छोट्या वाहनांची रहदारी या बंद करण्यात आली आहे.
पोकलेन गेले वाहून
भंडारा जवळील आंभोरा येथे बायपास पुलाचे काम सुरू आहे. या ठिकाणी पोकलेन मशीनसह अन्य साहित्य मोठ्या प्रमाणावर आहे. वैनगंगेला पूर आल्याने या पुराच्या प्रवाहात सकाळी पोकलेन मशीन वाहून गेले. गोसेखुर्दच्या पात्राकडे हा प्रवाह जात असून अंभोरा येथील नवनिर्मित पुलाला धोका निर्माण झाला होता मात्र प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष घालुन युध्दपातळीवर पोकलेनचा शोध घेतला असता तिड्डी नदी परिसरात सदर पोकलेन मिळनु आले.
गरोदर महिलेचा ‘रेस्क्यु’
जिल्ह्यात उद्भवलेल्या पुर परिस्थितीमुळे लाखांदुर तालुक्यातील बोथली या गावाला नदीच्या पाण्याने वेढा पडला आहे. या गावातील एका गरोदर महिलेची तब्येत अचानक बिघडली. माहिती मिळताच लाखांदूर तहसीलदार वैभव पवार यांनी तातडीने कार्यवाही करीत त्यांना सदर गरोदर महिलेला वैद्यकीय सेवा मिळावी याकरीता जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथील जिल्हा शोध व बचाव पथक यांना तातडीने पाचारण करण्यात आले. जिल्हा शोध व बचाव पथक यांनी बोटीच्या सहाय्याने सदर गरोदर महिला व इतर ७ जणांना सुखरूप बाहेर काढले. सदर महिलेला सुरक्षित बाहेर काढून तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आले आहे. श्रीमती अश्विनी मांजे, उपविभागीय अधिकारी साकोली, वैभव पवार तहसीलदार लाखांदूर, अखिल भारत मेश्राम नायब तहसीलदार लाखांदूर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पडोळे यांचे उपस्थितीत हे बचावकार्य जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा शोध व बचाव पथकाचे सदस्य सिताराम कोल्हे व अमरसिंग रंगारी यांनी पार पाडले.