भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : संगणक युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडू नये या उद्देशातून समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राज्यातील २हजार २७३ शाळेमध्ये संगणक प्रयोगशाळा स्थापित केल्या असून प्रत्येक शाळेवर या संगणक प्रयोगशाळेसाठी प्रशिक्षक सुद्धा रुजू करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागात राहणारे विद्यार्थी सुद्धा माहिती तंत्रज्ञानाचे अध्ययन करीत आहेत. आधुनिक काळात टिकायचे असेल तर संगणकाशी मैत्री करावी लागेल व ते शिकावं पण लागेल. हे उद्दिष्ट समोर ठेवून, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई,राज्य प्रकल्प संचालक आर.विमला यांनी आयसीटी (इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी) हा उपक्रम राबविण्याचे योजिले आहे.
भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील पंधरा शाळेमध्ये व पंचायत समितीच्या दोन गट साधन केंद्रामध्ये हा उपक्रम सुरू आहे. अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई आर.विमला यांच्या सूचनेप्रमाणे व भंडारा जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाने राबविण्यात येत आहे.यामध्ये विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण व प्रोजेक्टरच्या माध्यमातून विज्ञान, इतिहास, भूगोल या प्रात्यक्षिक असलेल्या विषयांचे आॅनलाईन अध्यापन सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक परिणामकारक पद्धतीने अध्यापन केले जात आहे. खाजगी महागड्या शाळेत दिसणारी संगणक प्रयोगशाळा आता जिल्हा परिषदेच्या व ग्रामीण भागातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये बघायला मिळत आहे. येणाºया काळात या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होईल असे मत शिक्षण क्षेत्रात व्यक्त होत आहे.