गोवर्धन निनावे/भंडारा पत्रिका भंडारा : महाराष्ट्रातील भंडारा शहराला लागून असलेल्या गणेशपूर गावातील ‘नवसाचा राजा’ ची काही वेगळीच गाथा आहे. येथील बाप्पा हा नवसाला पावणारा असून प्रत्येक वर्षी येथे मोठ्या संख्येने भाविक-भक्त आपले मनोकामना घेऊन येतात व श्रद्धापूर्वक मनोकामना मागितलेल्या भक्तांचे इच्छा पूर्ण सुद्धा होतात. विशेष म्हणजे ज्या भक्तांचे मनोकामना पूर्ण होतात ते त्या वर्षीची मूर्ती दान करतात व ही परंपरा मागील २८ वर्षांपासून सुरु आहे. सन १९९५ साली येथील काही स्थानिक सदस्यांद्वारे न्यू कुमार गणेशोत्सव मंडळ स्थापन करण्यात आले व त्या वर्षापासूनच येथील मंडळी मोठ्या जल्लोषात, एकोप्याने व कुठल्याही जातीधर्माचा भेद न ठेवता उत्सव साजरा करतात. २०२२ या वर्षी मंडळाने आपला २५ वा वर्ष ‘रौप्य महोत्सव’ च्या स्वरूपात मोठ्या थाटामाटाने साजरा केला होता. सन १९९९ सालच्या गणेश उत्सवादरम्यान येथील एका भक्ताची प्रकृती खूपच खालावली होती व सर्व प्रकारचा औषधोपचार करून सुद्धा ते बरे होऊ शकत नव्हते.
शेवटी डॉक्टरांनी त्यांचा कुटुंबीयांना आपण काहीही न करू शकण्याचे शब्द दिले व आता सर्व काही ईश्वराच्या कृपेवर आहे असे सांगितले, त्यावेळी बाप्पा आपल्या ठिकाणी विराजमान होते. त्यांचा घरच्यांनी मंडपात येऊन बाप्पांसमोर साकडे घालण्यास सुरुवात केली व प्रकृती सुधारल्यास ‘सोन्याचे डोळे’ दान देण्यास कबूल केले. चमत्कार झाला असा की, अवघ्या दोन दिवसांतच त्या भक्ताची प्रकृती सुधारण्यास सुरुवात झाली व ते पूर्णपणे बरे झाले.
शेवटी त्या भक्तांनी कबूल केलेले सोन्याचे डोळे दान केले व आजही ते डोळे प्रत्येक वर्षी गणेश उत्सवादरम्यान बाप्पांना लावले जातात. अश्याप्रकारे हा नवसाला पावणारा राजा प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहात येतो व भाविकांचे मनोकामना पूर्ण करतो. यावर्षी सुभाष वॉर्ड, गणेशपूर येथील न्यू कुमार गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष राजेश आंबोने, उपाध्यक्ष प्रसन्ना थोटे, सचिव हिमांशू सारवे, कोषाध्यक्ष गौतम थोटे तसेच मंडळाचे इतर कार्यकर्ते यांच्यावतीने या ‘नवसाचा राजा’ गणेश उत्सवाचे व्यवस्थीतपणे आयोजन केले आहे. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.