भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : मुसळधार पाऊस व धरणातील बेछूट पाण्याच्या महापुराने भंडारालगतच्या गणेशपूर हद्दीतील सत्कार नगर, नेहरू वॉर्ड, आंबेडकर वॉर्ड तसेच जुना नागपूर नाका परिसर जलमय झाले. चारही बाजूनी पुराच्या पाण्याने वेढले आणि मागच्या पुढच्या दाराने घरातही पाणी शिरले. त्यामुळे अस्ताव्यस्त पसरलेल्या पुराने नागरिकांची तारांबळ उडाली. तब्बल तीन दिवसानंतर पूर ओसरले. मात्र पुराच्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहे. जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसाने झोडपले आणि पुराने नागरिकांना अक्षरश: रडवले. मात्र निसर्गापुढे हतबल झालेल्या प्रशासनाचे नियोजन शून्य धिंडवडे निघाले. पूर आले आणि तीन दिवसांनी ओसरलेही पण, ज्यांच्या घरात पुराच्या पाणी गेले. त्या लोकांचे संसार व जनजीवन रस्त्यावर आले.
अनेकांच्या घरातील टीव्ही, फ्रिज, सोफा, पलंग, अंथरून पांघरून, मुलांची पुस्तके, कपडे, भांडी कुंडी, महत्वाची कागदपत्रे, इत्यादी जीवनावशक वस्तू डोळ्यासमोर तरंगतांना पाहिले, काहींनी तर स्वत:चे मरणही दारापुढे दिसले. दुचाकी, चारचाकी वाहने तर जागेवरच बुडाली, वर्षभर पुरेल इतके साठवून ठेवलेल्या अन्न -धान्याचे पाणी पाणी झाले, पूर ओसरल्यानंतर परिसरात रस्त्यावर तसेच घरासमोर चिखल साचले, काडी कचरा, प्लास्टिकच्या बॉटल्स, पिशव्या, इत्यादी कचरा जिकडे तिकडे पसरला आहे. परिणामी पूर बाधित क्षेत्रात दुर्गंधी पसरली. मात्र स्थानिक प्रशासनाचे कोणीही सफाई कर्मचारी फिरकले नाही. परिसरातील पुराच्या पाण्यामुळे घरगुती विहिरी तसेच बोअरवेलचे पाणी गढूळ झाल्याने पिण्याचा पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना प्रशासनाला याचे काहीही देणेघेणे नाही. यामुळे पूर ओसरले पण, आरोग्य समस्याचे काय? असा संतप्त सवाल पूरपिडीतांनी विचारला आहे.