भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : मुली कर्तुत्ववान असतात, खंबीर असतात, स्वाभिमानी असतात. प्रत्येक क्षेत्रात मुलींनी समाजात आपले स्थान निर्माण केले आहे. एक पाऊल पुढे या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या दहावीच्या सराव परीक्षेत वीस स्थानापर्यंत मुलीच भारी ठरल्या आहेत. मुलींच्या कर्तुत्वाने आईंच्या सन्मान केला जाणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल मोहगाव देवी येथे एक पाऊल पुढे उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वअध्ययन करावे, वेळेचे महत्व जाणून घ्यावे, दहावीच्या परीक्षेचा पूर्वानुभव घेतला जावा या उद्देशाने शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक गजानन वैद्य, हितेश सिंदपुरे यांनी उपक्रम राबवले. आकांक्षा शांडील्य, मोहन वाघमारे, श्रीहरी पडोळे यांनी उपक्रम राबविण्यास मदत केली.
मार्च – २०२४ झालेल्या शालांत परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांवर सत्र प्रारंभी जुलै महिन्यात दहावीतील विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत ३७ विद्यार्थ्यांनी परीक्षेकरता नोंदणी केली होती. शिक्षण मंडळ नियमांच्या धर्तीवर परीक्षा घेण्यात आली. तसेच बेस्ट फाईव्ह प्रमाणे विद्यार्थ्यांना गुणदान व निकालही लावण्यात आले. शाळेतील परीक्षा प्रमुख हितेश सिंदपुरे यांनी १५ आॅगस्ट रोजी निकाल घोषित केला. घोषित झालेल्या निकालात मुलीच आघाडीवर असल्याचे दिसून आले. यात चार विद्यार्थिनींनी ९० टक्के पेक्षा अधिक गुण घेतले आहेत.