भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : सततच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना नुकसान भरपाई व पिक विम्याची रक्कम देण्यात यावी अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. हरेंद्र राहांगडाले यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना उपविभागीय अधिकारी तुमसर यांचे मार्फत पाठविलेल्या एका निवेदनाद्वारे केली आहे. भंडारा जिल्ह्यातील शेतकºयांना अतिवृष्टीने चांगलेच झोडपले आहे.
धानाचे फुलोरे झडून धान भुई सपाट झाले आहे. ९ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर पर्यंत झालेल्या अतिवृष्टीत भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, मोहाडी, लाखनी, पवनी, साकोली व लाखांदूर तालुक्यातील शेतकºयांच्या शेतातील धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या शेतकºयांना आर्थिक मदत देण्यात यावी तसेच त्या शेतकºयांना पीक विमा सुद्धा लागू करण्यात यावा अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ.हरेंद्र रहांगडाले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत सलामे, जिल्हा सचिव दुर्गा परतेती, तालुका अध्यक्ष अशोक पटले, गोपाल येडे, विनोद पटले, रवींद्र बोपचे, रामभाऊ बिसेन, राहुल सुकला व इतर शेतकºयांनी केली आहे. निवेदनाच्या प्रती आ. परिणय फुगे, आ. राजू कारेमोरे तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र व जिल्हाधिकारी भंडारा यांना पाठविण्यात आले आहे.