भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : येथील नगर परिषदेचे प्रामाणिक आणि शिस्तप्रिय मुख्यधिकारी म्हणून लौकिक मिळवलेल्या सिद्धार्थ मेश्राम यांना राजकीय दबावापोटी त्यांची अचानक तडकाफडकी बदली करण्यात आली असल्याने तुमसर शहरातील नागरीकांनी रोष व्यक्त केला व त्यांची बद्दली रद्द करण्याकरीता तहसीलदार, तुमसर मार्फत मुख्यमंत्री, मुंबई व जिल्हाधिकारी साहेब, भंडारा यांना रविदास लोंखडे व अनेक नागरिकांनी निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, आपल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात मेश्राम साहेबांनी एक कर्तव्यदक्ष, नियमाने वागणारा, जनतेची कामे तत्परतेने वेळेवर पुर्ण करणारा, नगरपरिषद तुमसर चे नाव आपल्या कार्य कुशलतेने जिल्हाभर आणि राज्यभर पसरविणारे (लौकिक करणारा ) नेहमी जनसेवा हा एकच मंत्र अंगी बाळगणारा अधिकारी आहे.
अशा कर्तव्यदक्ष अधिकाºयाची तड़काफडकी बदली केवळ दोन वर्षाच्या आत झाली. त्यांच्या बदलीमुळे तुमसर नगरवासियांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. अजुन काही वर्षाची सेवा त्यांच्याकडून तुमसर नगरास मिळावी याकरीता त्यांची झालेली बदली रद्द करावी. अन्यथा या विरोधात तुमसर नगरवासी तीव्र आंदोलनाचा पवित्रा हाती घेणार, याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा निवेदनातून दिला आहे. सदर निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले. यावेळी रविदास लोखंडे, महेश मेश्राम, आलोक बनसोड, आदेश शेन्डे, आनंद मासुलकर, किशोर माटे, निलेश वासनिक, दिनेश भवसागर, आनंद मेश्राम, अक्षय डोंगरे, निलेश माटे, सरोज पाटील आदी उपस्थित होते.