भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : गणरायाच्या आगमनापूर्वी राज्यात पाऊस चांगलाच सक्रिय झाला होता. त्यानंतर आता पाऊस परतीची वाट धरेल असे वाटत असताना येत्या तीन दिवसात राज्यात पावसाची ये-जा राहील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे. अनंत चतुर्दशीला पाऊस विश्रांती घेणार असला तरीही आज आणि उद्या मात्र, पावसाच्या आगमनाचे संकेत आहेत. पाऊस परतणार असे वाटत असतानाच पुन्हा एकदा पाऊस जोर धरणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. पश्चिम बंगाल आणि बांगलादेश याठिकाणी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पावसाने पुन्हा जोर धरल्याचे भारतीय हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. कोकणात रत्नागिरी, रायगड या दोन जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. सोमवार, १६ सप्टेंबरला विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर अनंत चतुर्दशीला मात्र पाऊस विश्रांती घेणार असल्याने गणरायाला पावसाच्या अडथळ्याविना निरोप देता येणार आहे.