भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : इंदोरा खुर्द येथील गरजू लाभार्थ्यांना घरकुल मंजूर न करता धनाड्यांना घरकुल मंजूर केल्याने तसेच येथील राशन दुकानाचा परवाना रद्द झाल्याने परत त्याच दुकानदारास पुरवठा अधिकाºयांनी अन्यायकारक रीत्या दुकान दिल्याने या विरोधात अनेकदा संबंधितांना निवेदन देऊनही त्यांचे मागण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आज पासून दहा व्यक्तींनी तिरोडा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. तिरोडा तालुक्यातील इंदोरा खुर्द येथील अतिवृष्टीने घरे पडलेले तसेच ज्या गरजूंना राहण्याकरता घरे नाही अशा व्यक्तींनी अनेकदा ग्रामपंचायत व खंडविकास अधिकारी,
यांना निवेदन देऊनही त्यांना घरकुलाचा लाभ न देता गावातील अनेक धनाड्यांना घरकुलांचा लाभ दिल्याने तसेच इंदोरा खुर्द येथील राशन दुकान क्रमांक ९० यांनी भ्रष्टाचार करून अनेक लाभार्थ्यांना राशन पासून वचींत ठेवल्याने संबंधित विभागाकडे तक्रारी केल्यावरून या राशन दुकानाचा परवाना रद्द करून अनामत रक्कम शासन जमा करण्यात आल्यावरही जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी अन्याय कारक रीत्या संबंधित दुकानदारास परत परवानगी दिल्याने या विरोधात गावकºयांनी विभागीय आयुक्ताकडे तक्रार केल्यावरून आयुक्तांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना त्वरित बोलके आदेश काढून या रेशन दुकानदाराचा परवाना रद्द करण्याचे आदेश २०१७ मध्ये देऊनही हे दुकान रद्द करण्यात न आल्याने जिल्हाधिकारी गोंदिया , पोलीस अधीक्षक गोंदिया, मुख्य कार्यपालन अधिकारी गोंदिया,उपविभागीय अधिकारी तिरोडा , तहसीलदार तिरोडा,खंड विकास अधिकारी प.स.तिरोडा यांना ११३ गावकºयांचे सहयांचे निवेदन देऊन १७ सप्टेंबर २४ पर्यंत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास १८ सप्टेंबर पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करू असे निवेदन देऊनही यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्याने आज दिनांक १८ सप्टेंबर पासून तिरोडा तहसील कार्यालयासमोर इंदोरा खुर्द येथील शिशुपाल गभने, विजय राऊत ,अनिल सातक ,दिनेश भोयर, रोशन पटले, नथू कोकूडे ,देवीलाल राऊत, दुर्गाप्रसाद पटले ,वासुदेव लाडे, दिनेश गभने हे आमरण उपोषणावर बसले आहेत.