भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शासकीय नियमांच्या पलीकडे जाऊन देखील मानवी भावना जपता येतात. याचा प्रत्यय जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोयाम यांच्या कार्यशैलीने आला. त्याचा सविस्तर वृत्तांत असा की, जिल्हा रुग्णालय भंडारा येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वयोगटातील अंगणवाडीतील बालकांची व शालेय विद्यार्थ्यांचे मोफत आरोग्य तपासणी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत तपासणी पथकामार्फत नियमित करण्यात येते. आरोग्य तपासणीअंती भंडारा जिल्हयामध्ये एकुण १३२ संशयीत हृदय शस्त्रक्रियेचे लाभार्थी आढळून आलेले होते. त्यापैकी एकुण २१ हृदयशस्त्रक्रियेकरीता पात्र लाभार्थ्यांपैकी १५ लाभार्थ्यांना दि. १३ सप्टेंबर २०२४ ला आचार्य विनोबा भावे ग्रामिण रुग्णालय सावंगी मेघे, वर्धा येथे हृदयशस्त्रक्रियेकरीता संदर्भात करण्यात आले होते. त्यापैकी दि. १८ सप्टेंबर २०२४ ला ५ हृदयशस्त्रक्रिया संपन्न करण्यात आल्या.
त्यामधील चि. कृष्णाई योगेश ब्राम्हणकर, वय २ वर्ष, रा. बारव्हा, ता. लाखांदूर, जिल्हा भंडारा येथिल सॅम मधील बालक बºयाच दिवसापासुन हृदयाचा गंभीर आजाराने ग्रासलेला होता. करीता हिची शस्त्रक्रिया ही महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये करण्याचे ठरविले होते. परंतु लाभार्थ्यांचा पालकाकडे स्वत:चे राशनकार्ड नसुन राशनकार्डवर नावाची नोंद सुदधा नव्हती. त्यामुळे शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये नोंदणी होवू शकली नाही. त्याअनुषंघाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिपचंद सोयाम यांच्या अथक प्रयत्नाने तसेच डॉ. अतुलकुमार टेंभुर्णे अति. जिल्हा शल्यचिकित्सक जि.रु. भंडारा, डॉ. मधुकर कुंभरे, निवासी वैद्यकीय अधिकारी (वा.सं) जि.रु. भंडारा व संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी, आरोग्य तपासणी पथक व आचार्य विनोबा भावे ग्रामिण रुग्णालय सावंगी मेघे, वर्धा यांचा सहकार्याने तिची हृदय शस्त्रक्रिया राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत उपलब्ध निधीमधून यशस्वी पार पाडण्यात आली. सद्यस्थिती सदर लाभार्थ्याची प्रकृती बरी आहे व चि. कृष्णाई योगेश ब्राम्हणकर हिच्या आई वडीलांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांचे आभार मानले आहे.