भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : सध्या देश बलात्का- राच्या घटनांनी होरपळत असताना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी चार वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न आणि आईचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार घडला होता. यानंतर पीडित कुटुंबाने न्यायासाठी मोर्चा काढला असता आरोपींनी वृद्ध महिलेवर प्राणघातक हल्ला केला.
या हल्ल्यात वृद्ध महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर नागपुरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्राप्त माहितीनुसार, लाखांदूर तालुक्यातील कोदामेंढी इथल्या नाथजोगी समाजातील चार वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला तर तिच्या आईचा विनयभंग केल्याची घटना १७ जुलैला घडली होती. या प्रकरणात दिघोरी पोलिसांनी आरोपींवर कारवाई न करता त्यांना अभय दिल्याचा आरोप करीत नाथजोगी समाज बांधवांनी दोन दिवसापूर्वी लाखांदूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्या नराधम हल्लेखोर आरोपीला अटक करावी आणि ठाणेदारावर कारवाई करण्याची मागणी या मोर्चातून करण्यात आली होती. न्यायासाठी मोर्चा काढल्यानंतर पीडितेच्या कुटुंबावर आरोपींनी हल्ला केला. यात पीडितेची सासू सयाबाई वाडस्कर( ६०), गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात येत आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे.