भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : तालुक्यातील ग्रामपंचायत गराडा येथे गेल्या अनेक वर्षांपासून खुलेआम अवैध दारू धंदा सुरू आहे. गावातील तरुण अंमली पदार्थांच्या आहारी जात आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी दारूबंदीसाठी आवाज उठवत सोमवारी (ता. २३) ला गावात मोर्चा काढून मोहीम राबवली. या ठिकाणी गावात दारूबंदी करावी तसेच सुरु असलेले अवैध धंदे देखील बंद करण्याची मागणी केली आहे. गराडा गावातील शेकडो महिलांनी तंटामुक्त अध्यक्ष उमेश वालदे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून गावातील अवैध दारू आणि अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली आहे. तसेच संपूर्ण लाखनी तालुक्यात अवैध दारू विक्री आणि अवैध धंदे सुरू असल्याने अनेकांचे घरे उद्ध्वस्त झाली असून कुटुंब रस्त्यावर आले. लहान मुलांना देखील याची सवय लागत असल्याने ते वाईट मार्गाने जात असल्याचे चित्र गराडा गावात आहे.
गावात अवैधरीत्या दारू विक्री होत असल्याने गावातील पुरुष व तरुणांना दारूचे व्यसन लागले आहे. गावातच दारू उपलब्ध होत असल्याने नशेबाज पती घरातील महिलांना वाद घालतात आणि मारहाण करतात. किरकोळ भांडणाच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे गावातील अवैध दारू व्यवसायावर कारवाई करून त्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी. गावात दारूबंदी केली नाही, तर या मागणीसाठी पुढील वेळी सर्व महिला जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा यांचे दरवाजे ठोठावतील, असा इशाराही महिलांनी दिला. यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, उमेश वालदे, महिला सरपंच दीक्षा मेश्राम, गीता कठाणे, रवी नागदेवे, संजय उईके, ताराचंद वाघाये, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर कठाणे, मनोज मेश्राम, दारू बंदी समिती अध्यक्ष वैशाली कठाणे, रागिणी पेंदाम, संगीता साखरे, पोलीस कर्मचारी, यासह, गावाकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.